Blinkitच्या मालाड गोदामावर FDAचा दणका! झुरळांचा सुळसुळाट, मुदतबाह्य अन्नसाठा;

महाराष्ट्र

मुंबई : मालाड परिसरातील ‘ब्लिंक कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड’ (Blinkit) च्या गोदामावर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) धडक कारवाई केली आहे. ७ ऑगस्ट रोजी करण्यात आलेल्या अचानक तपासणीत अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेसंदर्भात गंभीर त्रुटी आढळून आल्याने गोदामाचा अन्न परवाना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आला आहे.

FDA अधिकाऱ्यांच्या तपासणीत फळे आणि भाजीपाला साठवणुकीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झुरळांचा वावर आढळून आला. तसेच कीटक आणि उंदीर नियंत्रणासाठी प्रभावी Pest Control यंत्रणा कार्यरत नसल्याचे निदर्शनास आले. गोदामातील स्वच्छतेची स्थितीही अत्यंत खराब असल्याचे तपासणीत समोर आले.

अन्नपदार्थ थेट जमिनीवर ठेवण्यात आले होते. कोल्ड स्टोरेजची नियमित स्वच्छता केली जात नसल्याचेही आढळले. याशिवाय कोल्ड रूमसह गोदामाच्या विविध भागांत मुदतबाह्य आणि खराब झालेले पॅकबंद अन्नपदार्थ साठवून ठेवण्यात आले होते.

तपासणीदरम्यान अन्नसाठवणुकीसाठी आवश्यक असलेल्या FIFO (First In, First Out) आणि FEFO (First Expired, First Out) या पद्धतींचे पालन केले जात नसल्याचेही स्पष्ट झाले. अन्नपदार्थ हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांची आवश्यक वैद्यकीय तपासणी करण्यात आलेली नव्हती आणि त्यासंबंधीच्या नोंदीही उपलब्ध नव्हत्या.

कचऱ्याची योग्य विल्हेवाट, दैनंदिन स्वच्छता आणि गोदामाच्या देखभालीतही अनेक त्रुटी आढळल्या. या सर्व बाबींची गंभीर दखल घेत FDA ने अन्न सुरक्षा आणि मानके कायदा, २००६ आणि संबंधित नियमांनुसार कारवाई केली आहे.

गोदामातून अन्नविक्री आणि वितरणावर बंदी

परवाना निलंबित करण्यात आल्याने संबंधित गोदामातून कोणत्याही प्रकारच्या अन्नपदार्थांची विक्री, पुरवठा किंवा वितरण करण्यास मनाई करण्यात आली आहे. निलंबनाच्या कालावधीत अनधिकृतपणे व्यवसाय किंवा अन्नसाठ्याचे वितरण सुरू असल्याचे आढळल्यास संबंधित व्यवस्थापनाविरोधात कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा FDA ने दिला आहे.

दरम्यान, नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्नपदार्थ मिळावेत यासाठी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खाद्य आस्थापनांविरोधात अशाच प्रकारची धडक तपासणी आणि कठोर कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याचे अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत