नांदेडमध्ये शिवसेनेला बळ; असंख्य पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

महाराष्ट्र

मुंबई : नांदेड जिल्ह्यात शिवसेनेच्या संघटनविस्ताराला आणखी बळ मिळाले आहे. शंकरअण्णा धोंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार बालाजी कल्याणकर यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्ह्यातील विविध भागांतील पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मुंबईतील नंदनवन बंगल्यावर झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे यांनी नव्या कार्यकर्त्यांचे स्वागत केले.

नाळेश्वर, राहटी आणि पिंपळगाव (कोरका) यांसह जिल्ह्यातील विविध भागांतील कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला. नाळेश्वर येथील माजी जिल्हा परिषद सभापती नरहरी ठाकराम वाघ, माजी सरपंच रुपेश केशवराव वाघ, ग्रामपंचायत सदस्य बालाजी व्यंकटी इंगोले, ग्रामपंचायत सदस्य बालाजी दत्ता भारती आणि शालेय व्यवस्थापन समितीचे बळीराम उत्तम वाघ यांचा प्रवेश करणाऱ्यांमध्ये समावेश आहे.

राहटी येथील भोजराज वामनराव बोकारे, रावसाहेब नागोराव बोकारे, गोविंद पुंडलिक बोकारे, भागवत एकनाथ बोकारे, लक्ष्मण भानुदास बोकारे आणि रतन संभाजी बोकारे यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. पिंपळगाव (कोरका) येथील नागेश व्यंकटराव बडवणे, जिल्हा परिषद सदस्य बाळगीर खुशालगिरी गिरी महाराज, दत्तरामजी गणेशराव बडवणे, बालाजीराव माधवराव डुकरे, रावसाहेब दत्तरामजी सूर्यवंशी आणि गोविंदराव रावण जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते शिवसेनेत दाखल झाले.

यावेळी एकनाथ शिंदे यांनी आमदार बालाजी कल्याणकर यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. “तुमच्या पाठीशी बालाजी कल्याणकर स्वतः आहेतच; पण बालाजी कल्याणकर यांच्या पाठीशी हा एकनाथ शिंदे आहे. सगळ्यांच्या पाठीशी मी स्वतः आहे, शिवसेना आहे,” अशी ग्वाही त्यांनी दिली.

बालाजी कल्याणकर यांच्या मतदारसंघात विकासकामे झाली, जनतेला न्याय मिळाला आणि नागरिकांचे प्रश्न सोडवण्यात आले. त्यामुळेच मतदारसंघातील जनतेने त्यांना पुन्हा निवडून दिले, असे सांगत शिंदे यांनी कल्याणकर यांच्या कामाचे कौतुक केले.

महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला आशीर्वाद दिला असून, बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना आणि आनंद दिघे यांच्या शिकवणीला आदर्श मानून शिवसेनेची वाटचाल सुरू असल्याचे शिंदे यांनी नमूद केले.

शंकरअण्णा धोंडगे यांच्या कार्याचा उल्लेख

शिंदे यांनी शंकरअण्णा धोंडगे यांच्या कार्याचाही उल्लेख केला. धोंडगे यांनी ज्येष्ठ शेतकरी नेते शरद जोशी यांच्यासोबत काम केले असून, यापूर्वी लोहा येथे त्यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. आता बालाजी कल्याणकर यांच्या मतदारसंघातील विविध भागांतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिवसेनेत दाखल झाल्याने नांदेडमध्ये पक्षाच्या संघटनविस्ताराला आणखी वेग मिळाल्याचे शिंदे म्हणाले.

“८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण” ही शिवसेनेची भूमिका असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आपल्या अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात सर्वसामान्यांच्या जीवनात बदल घडवणारे अनेक निर्णय घेतल्याचा दावा शिंदे यांनी केला. लाडकी बहीण योजना, शेतकरी सन्मान योजना, युवा प्रशिक्षण योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या विविध योजनांचा त्यांनी उल्लेख केला.

महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना दिलेले कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण केल्याचे सांगत शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा होऊ लागल्याचे नमूद केले. “दिलेला शब्द पाळणारी, दिलेला शब्द खरा करणारी आणि सर्वसामान्यांची शिवसेना” म्हणून जनतेच्या मनात शिवसेनेबद्दल विश्वास निर्माण झाला आहे, असा दावा त्यांनी केला.

दरम्यान, महाराष्ट्रातील जिल्ह्या-जिल्ह्यातून आणि तालुका-तालुक्यातून विविध पक्षांतील लोक शिवसेनेत प्रवेश करत असल्याचेही शिंदे यांनी सांगितले. नांदेडमधील या पक्षप्रवेशामुळे आगामी काळात शिवसेनेच्या संघटनात्मक ताकदीला आणखी बळ मिळण्याची शक्यता आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत