शिरुर (तेजस फडके): पुणे-नगर महामार्गावरील शिरुर बायपास येथे संग्राम हॉटेलसमोर मंगळवार (दि ११) झालेल्या चार वाहनांच्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर शिरुर बायपासवरील रस्ता दुभाजकाच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. संग्राम हॉटेलसमोर रस्ता दुभाजक बेकायदेशीरपणे तोडून तयार करण्यात आलेल्या मार्गामुळेच वाहनचालकांना धोकादायक परिस्थितीला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप संतप्त नागरिक व वाहनचालकांकडून होत आहे.
मंगळवारी दुपारी सुमारे ४:५० वाजता अहिल्यानगरच्या दिशेने आलेल्या मालवाहू कंटेनरने फोर्ड इंडिव्हरला जोरदार धडक दिली. त्यानंतर इंडिव्हरची दुचाकीला धडक बसली. त्याचवेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या एसटी बसशी दुचाकी आणि इंडिव्हरची समोरासमोर धडक झाली. काही क्षणांत घडलेल्या या विचित्र अपघातात फोर्ड इंडिव्हर चालक उद्योजक किशोर यादव (रा. वाडेगव्हाण, ता. पारनेर, जि.पुणे) तसेच दुचाकीस्वार प्रथमेश प्रकाश लाड (वय ३०), रा. पलूस-कुंडल, जि. सांगली, यांचा मृत्यू झाला.
View this post on Instagram
मात्र, हा अपघात केवळ वाहनांच्या धडकेचा विषय नसून महामार्गावरील नियोजन आणि सुरक्षेचा गंभीर प्रश्न असल्याची चर्चा आता सुरु झाली आहे. संग्राम हॉटेलसमोर रस्ता दुभाजक तोडून तयार झालेल्या या अनधिकृत ‘कट’मधून वाहने ये-जा करत असल्याने विरुद्ध दिशेची वाहतूक अचानक समोर येते. त्यामुळे वाहनचालकांचा अंदाज चुकून अपघाताला निमंत्रण मिळत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
‘बळी गेल्यानंतरच कारवाई होणार का…?’
रस्ता दुभाजक तोडण्यास परवानगी कोणी दिली…? तो अधिकृत आहे का…? अधिकृत नसेल तर तो अद्याप बंद का करण्यात आलेला नाही…? या ठिकाणी यापूर्वी किती अपघात झाले आणि किती जणांना जीव गमवावा लागला…? या प्रश्नांची उत्तरे संबंधित यंत्रणांनी देणे आवश्यक आहे. महामार्गावर वाहतुकीची सुरक्षितता सुनिश्चित करण्याची जबाबदारी असताना या धोकादायक दुभाजकाकडे वर्षानुवर्षे दुर्लक्ष होत असेल, तर प्रशासन नेमके कोणत्या दुर्घटनेची वाट पाहत आहे, असा संतप्त सवाल वाहनचालक उपस्थित करत आहेत.
अपघातानंतर आता तरी प्रशासन जागे होणार का…?
शिरुर बायपासवरील संग्राम हॉटेलसमोरील रस्ता दुभाजकाची तातडीने पाहणी करुन तो अनधिकृत असल्यास तो कायमस्वरुपी बंद करावा. तसेच आवश्यक ठिकाणी सुरक्षित व अधिकृत यू-टर्नची व्यवस्था, योग्य दिशादर्शक फलक, रिफ्लेक्टर, पथदिवे आणि सुरक्षा उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी होत आहे. अनेक निष्पाप नागरिकांचे बळी गेल्यानंतर पंचनामा, पाहणी आणि आश्वासने देण्यापेक्षा अपघात होण्यापुर्वीच प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे आहे. आणखी किती बळी गेल्यानंतर संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग येणार, हा संतप्त सवाल आता शिरुर बायपासवरील वाहनचालक आणि नागरिक विचारत आहेत.
शिरूर! राजस्थान ढाबा पार्किंगमध्ये भीषण अपघात; ट्रक अंगावरून गेलेल्या तरुणाचा मृत्यू…
Video: शिरूर तालुक्यात भीषण अपघातात चिमुकल्याचा मृत्यू तर तिघे जखमी…
शिरूर तालुक्यात भीषण अपघातात पाच जण गंभीर जखमी…
शिरूर शहर व तालुक्यात बेकायदा गतीरोधकांचा हैदोस; अपघातांमध्ये वाढ, नागरिकांमध्ये संताप
शिरूरमध्ये अपघात टाळण्यासाठी स्पीड ब्रेकर, दिशादर्शक फलक बसविण्याची नागरीकांची मागणी