शिरुरमध्ये २२ लाखांचे MD ड्रग जप्त; दोन आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखा व शिरुर पोलिसांची संयुक्त धडक कारवाई

क्राईम मुख्य बातम्या

शिरुर (तेजस फडके) शिरुर परिसरात अंमली पदार्थांच्या बेकायदा विक्रीविरोधात पुणे ग्रामीण पोलिसांनी पुन्हा एकदा जोरदार कारवाई करत ११० ग्रॅम वजनाचा सुमारे २२ लाख रुपये किमतीचा एम.डी. (मेफेड्रोन) अंमली पदार्थ जप्त केला. मलठण येथील राजवाडा चौक परिसरात करण्यात आलेल्या या कारवाईत एम डी ची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून मोटारसायकलसह एकूण २२ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

‘नशामुक्त भारत अभियान’ आणि ‘ड्रग्स फ्री महाराष्ट्र’ या उपक्रमाच्या पार्श्वभुमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात कारवाईचा वेग वाढविला आहे. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी अवैधरीत्या अंमली पदार्थ जवळ बाळगणाऱ्या व विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सुचना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांना दिल्या होत्या.

त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शिरुर परिसरात गस्त घालत असताना पोलीस हवालदार तुषार पंधारे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत सुरेंदसिंह भैरुसिंह राठोड उर्फ राजपुत (वय २४, सध्या रा. मनिष शिरोळे फॉर्म हाऊस, मलठण, ता. शिरुर; मूळ रा. गोगादेव की ढाणी, बांकियावास खुर्द, ता. कल्याणपूर, जि. बाडमेर, राजस्थान) आणि श्रवण तेजाराम बिष्नोई (वय ३१, रा. मनिष शिरोळे फॉर्म हाऊस, मलठण; मूळ रा. बांकियावास खुर्द, ता. कल्याणपूर, जि. बाडमेर, राजस्थान) हे MD अंमली पदार्थ विक्रीसाठी मलठण येथील राजवाडा चौकात येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.

या माहितीची खातरजमा करुन कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करण्यात आली. शिरुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले यांच्या आदेशानंतर पंचांसह स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरुर पोलीस स्टेशनचे संयुक्त पथक कारवाईसाठी रवाना झाले. दि १८ ऑगस्ट रोजी मध्यरात्री सुमारे १२:१० वाजता राजवाडा चौक येथे छापा टाकण्यात आला. या कारवाईत दोन्ही आरोपींना ताब्यात घेत त्यांच्या ताब्यातील ११० ग्रॅम प्रतिबंधित एम डी अंमली पदार्थ आणि मोटारसायकल जप्त करण्यात आली. या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशन येथे एनडीपीएस कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास शिरुर पोलीस करीत आहेत.

सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक डॉ शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन केनेकर, पोलीस उपनिरीक्षक गोविंद खटिंग, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार संजय पड्याळ, तुषार पंधारे, जनार्दन शेळके, संजू जाधव, राजू मोमीन, विकास पाटील, सागर धुमाळ, चेतन पाटील आणि शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार संदीप खेडकर, रवी काळे, ठोसरे यांनी केली.

शिरुर तालुक्यात एम डी सारख्या घातक अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या साखळीवर पोलिसांनी केलेली हि कारवाई महत्त्वाची मानली जात असून, या प्रकरणातुन अंमली पदार्थांच्या पुरवठ्याचे पुढील धागेदोरे उघड होण्याची शक्यता आहे. 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत