सुटे खाद्यतेल खरेदी टाळा; पॅकबंद तेलाचे लेबल तपासा

महाराष्ट्र

मुंबई : बाजारातून खाद्यतेल खरेदी करताना नागरिकांनी सुटे तेल खरेदी करणे टाळावे, तसेच पॅकबंद तेल घेताना लेबलवरील माहिती काळजीपूर्वक तपासावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी केले आहे. तेलाच्या पॅकवर बॅच क्रमांक, उत्पादनाची तारीख, ‘बेस्ट बिफोर’ किंवा ‘एक्सपायरी डेट’ यांसह पॅक व्यवस्थित सीलबंद आहे की नाही, याची खात्री करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जुने, गंजलेले किंवा पुनर्वापर केलेल्या डब्यांमधून खाद्यतेल विकले जात असल्यास नागरिकांनी असे तेल खरेदी करू नये आणि संबंधित प्रकाराची तक्रार करावी. बहुस्त्रोत खाद्यतेलाच्या पॅकवर AGMARK चिन्ह असणे आवश्यक असून, त्यामध्ये वापरण्यात आलेल्या घटक तेलांची नावे आणि त्यांचे प्रमाण टक्केवारीत स्पष्टपणे नमूद असणे गरजेचे आहे.

वारंवार तापवलेले तेल आरोग्यासाठी धोकादायक

खाद्यतेल वारंवार तापवून वापरणे टाळावे, असा सल्लाही देण्यात आला आहे. भेसळयुक्त, दूषित किंवा अयोग्य पद्धतीने साठवलेल्या तेलामुळे आर्थिक नुकसान होण्याबरोबरच दीर्घकालीन आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. निकृष्ट तेलाच्या सेवनामुळे एपिडेमिक ड्रॉप्सीस तसेच हृदयाशी संबंधित गंभीर समस्या उद्भवू शकतात.

गंजलेल्या किंवा खराब डब्यांमधून शिसे (Lead) तेलात मिसळण्याची शक्यता असून, त्याचा विशेषतः बालकांच्या मेंदूच्या विकासावर विपरीत परिणाम होऊ शकतो. तसेच तेल वारंवार तापवल्याने होणारे ऑक्सिडेशन आणि ट्रान्स फॅटी अॅसिड्स यांचा उच्च रक्तदाब, यकृत व मूत्रपिंडाच्या हानीसह दीर्घकालीन आरोग्य समस्यांशी संबंध असल्याचे सांगण्यात आले आहे.

नागरिकांनी तक्रार करण्याचे आवाहन

खाद्यतेलाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी नागरिक, खाद्य व्यवसाय चालक (FBOs) आणि संबंधित अधिकाऱ्यांनी नियमांची प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. खाद्यपदार्थांशी संबंधित तक्रारींसाठी 1800-222-365 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधता येतो. तसेच Food Safety Connectच्या माध्यमातूनही तक्रार नोंदवता येते.

खाद्यतेलातील भेसळ आणि अयोग्य साठवणूक रोखण्यासाठी लागू असलेल्या नियमांची माहिती नागरिक तसेच खाद्य व्यवसाय चालकांना व्हावी आणि त्यांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, या उद्देशाने महाराष्ट्रात संबंधित आदेशांची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे तुकाराम मुंडे यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत