मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीवरून सुरू झालेला पक्षांतर्गत वाद आता नव्या राजकीय आरोपांमुळे चांगलाच तापण्याची शक्यता आहे. पक्षाचे राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पाठवलेल्या रिमाइंडर नोटिशीवरून काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गंभीर राजकीय संशय व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भाजपचे काही ‘हस्तक’ किंवा ‘स्लीपर सेल’ कार्यरत असल्याचा दावा पटोले यांनी केला आहे.
सच्चिदानंद सिंह यांनी १७ ऑगस्ट २०२६ रोजी सुनेत्रा पवार यांना रिमाइंडर नोटीस पाठवली आहे. यापूर्वी ९ जुलै रोजी त्यांच्याकडून कायदेशीर नोटीस बजावण्यात आली होती. निर्धारित १५ दिवसांच्या मुदतीत त्या नोटिशीला उत्तर मिळाले नसल्याने ही रिमाइंडर नोटीस पाठवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीवर आक्षेप
राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवड प्रक्रियेवरून हा वाद सुरू झाला आहे. २६ फेब्रुवारी रोजी झालेल्या निवड प्रक्रियेला सच्चिदानंद सिंह यांनी आक्षेप घेतला आहे. पक्षाच्या घटनेनुसार आवश्यक निवडणूक यंत्रणा स्थापन करण्यात आली नाही, निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला नाही, तसेच राष्ट्रीय प्रतिनिधींना नामांकन दाखल करण्याची आणि मतदानाची पुरेशी संधी देण्यात आली नाही, असा त्यांचा दावा आहे.
या प्रक्रियेतून तयार झालेली पदाधिकाऱ्यांची यादी अवैध ठरवावी, तसेच निवडणूक आयोगाकडे करण्यात आलेला संबंधित पत्रव्यवहार मागे घेऊन पक्षाच्या घटनेनुसार नव्याने संघटनात्मक निवडणुका घ्याव्यात, अशी मागणी सिंह यांनी केली आहे.
सुनेत्रा पवारांसह वरिष्ठ नेत्यांना नोटीस
सच्चिदानंद सिंह यांनी सुनेत्रा पवार, कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल तसेच पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि निवडणूक आयोगाचे नोडल अधिकारी बृजमोहन श्रीवास्तव यांना नोटीस पाठवल्याचे सांगितले जात आहे.
नोटीसमधील मागण्यांवर १५ दिवसांत उत्तर किंवा आवश्यक कार्यवाही न झाल्यास निवडणूक आयोग अथवा न्यायालयात दाद मागण्याचा इशाराही देण्यात आल्याचे समोर आले आहे. सिंह हे राष्ट्रवादी काँग्रेसचे झारखंड प्रदेशाध्यक्ष राहिले असून, गेल्या सुमारे १५ वर्षांपासून पक्षाशी संबंधित असल्याचे सांगितले जाते.
‘राष्ट्रवादीत भाजपचे हस्तक कार्यरत’
या नोटिशीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत संघटनात्मक वादाला आता राजकीय रंग मिळाला आहे. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या प्रकरणावर भाष्य करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भाजपशी संबंधित काही व्यक्ती ‘हस्तक’ म्हणून कार्यरत असण्याची शक्यता व्यक्त केली.पटोले यांनी अशा व्यक्तींना ‘स्लीपर सेल’ अशी उपमा देत सच्चिदानंद सिंह यांच्या नोटिशीमागे त्यांच्यापैकी कोणाचा तरी हात असू शकतो, असा राजकीय संशय व्यक्त केला आहे.
भाजप आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे लक्ष
नाना पटोले यांच्या या आरोपामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत वादाला आता आणखी राजकीय धार आली आहे. त्यांच्या ‘स्लीपर सेल’च्या आरोपावर भाजप तसेच अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, सच्चिदानंद सिंह यांनी उपस्थित केलेल्या आक्षेपांवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून काय उत्तर दिले जाते आणि त्यानंतर हे प्रकरण निवडणूक आयोग अथवा न्यायालयात जाते का, याकडेही लक्ष आहे. त्यामुळे राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीवरून सुरू झालेला हा वाद आगामी काळात आणखी चिघळण्याची शक्यता आहे.