पुणे : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या ‘छात्रों की गूंज’ या विशेष संवाद कार्यक्रमात एका आदिवासी विद्यार्थिनीने आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्यांकडे लक्ष वेधत मांजरी येथे सुरू असलेल्या आंदोलनाला भेट देण्याची विनंती राहुल गांधी यांच्याकडे केली.
पुण्यातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांच्या प्रश्नांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी बेरोजगारी, स्पर्धा परीक्षांमधील अनियमितता, महागाई आणि वसतिगृहांच्या समस्यांसह विविध मुद्दे राहुल गांधी यांच्यासमोर मांडले.
संवादादरम्यान एका आदिवासी विद्यार्थिनीने आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना भेडसावणाऱ्या समस्यांचा पाढा वाचला. वेळेवर न मिळणाऱ्या शिष्यवृत्ती, शासकीय वसतिगृहांमधील अपुऱ्या सुविधा तसेच आदिवासी विकास विभागाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे तिने सांगितले.
तिने पुण्याजवळील मांजरी येथे सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा मुद्दाही उपस्थित केला. विविध प्रलंबित मागण्यांसाठी विद्यार्थी शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असून, राहुल गांधी यांनी स्वतः आंदोलनस्थळी भेट देऊन विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे, अशी विनंती तिने केली.
मांजरीत सहा विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण
मांजरी येथील आदिवासी शासकीय वसतिगृहातील मूलभूत सुविधांचा अभाव आणि शासन निर्णयातील (GR) काही जाचक अटींच्या विरोधात गेल्या दहा दिवसांपासून सहा विद्यार्थी—चार मुले आणि दोन मुली—बेमुदत उपोषण करत आहेत.
वसतिगृहात शुद्ध पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे आणि दर्जेदार भोजन यांसारख्या मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. त्याचबरोबर आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृह प्रवेशासाठी शासनाने जारी केलेल्या नव्या जीआरमधील काही तरतुदींनाही विद्यार्थ्यांचा विरोध आहे. विशेषतः वयाची अट रद्द करावी, अशी प्रमुख मागणी आंदोलक विद्यार्थ्यांनी केली आहे.
दहा दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणामुळे काही विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, प्रशासन आणि आदिवासी विकास विभागाकडून मागण्यांबाबत अद्याप ठोस तोडगा निघालेला नसल्याने आंदोलन सुरूच आहे.
राहुल गांधींकडून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चेचे आश्वासन
विद्यार्थिनीचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा केली. शिक्षणाचा अधिकार आणि विद्यार्थ्यांचे हक्क यासाठी काँग्रेस सातत्याने आवाज उठवत राहील, असे आश्वासन त्यांनी दिले.
दरम्यान, आंदोलनातील विद्यार्थ्यांची प्रकृती आणि त्यांच्या मागण्यांबाबत तातडीने शासनाने हस्तक्षेप करावा, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि विविध सामाजिक संघटनांकडून केली जात आहे.