सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री! सुप्रिया सुळेंची एकवाकी प्रतिक्रिया म्हणाल्या…

महाराष्ट्र राजकीय

मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेतील अकाली निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर आज सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शपथविधीसाठी त्या आज सकाळी मुंबईत दाखल झाल्या होत्या.

या घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अत्यंत मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया दिली. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या संभाव्य विलिनीकरणाबाबत तसेच सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, “मला यातलं काहीही माहिती नाही.”

यावेळी सुप्रिया सुळे यांनी आपण दिल्लीला रवाना होत असल्याचेही स्पष्ट केले. “उद्या संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत असून मी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाची सभागृह नेत्या आहे. त्यामुळे मला दिल्लीला जाणं आवश्यक आहे,” असं त्यांनी सांगितलं.

पत्रकारांनी वारंवार विचारलेल्या प्रश्नांवर अधिक प्रतिक्रिया देण्याचं टाळत सुप्रिया सुळे यांनी हात जोडून पुन्हा एकदा, “मला यातलं काहीही माहिती नाही,” असं म्हणत विषयावर मौन पाळलं.

दरम्यान, सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीमुळे राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या भूमिकांकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलं आहे.