पंजाबमध्ये भाजपचा ‘एकला चलो’चा नारा; २०२७ ची विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार

महाराष्ट्र

अकाली दलासोबतची युती संपुष्टात; भाजपकडून सर्व ११७ जागांवर उमेदवार देण्याची घोषणा

पंजाब: पंजाबच्या राजकारणात मोठी राजकीय घडामोड घडली आहे. भारतीय जनता पक्षाने २०२७ ची पंजाब विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय जाहीर केला आहे. अकाली दलासोबत पुन्हा युती होणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम देत भाजपचे प्रदेशाध्यक्ष केवल सिंग ढिल्लन यांनी पक्ष सर्व ११७ विधानसभा मतदारसंघांत स्वतःचे उमेदवार उभे करणार असल्याचे स्पष्ट केले.

मंगळवारी हॉटेल ले बॅरन येथे झालेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर ढिल्लन यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी भाजपचे नेते आणि कार्यकर्ते आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पूर्णपणे सज्ज असून पंजाबमध्ये भाजपचे सरकार स्थापन करण्याच्या उद्देशाने पक्षाचे काम सुरू असल्याचे सांगितले.

ढिल्लन म्हणाले की, पंजाबमधील सध्याची परिस्थिती चिंताजनक आहे. राज्यावरील कर्जाचा बोजा वाढत असून विकासकामांबाबतही अपेक्षित प्रगती होत नाही. तसेच कायदा आणि सुव्यवस्थेबाबत नागरिकांमध्ये चिंता आहे. त्यामुळे पंजाबच्या जनतेला आम आदमी पक्षाचे सरकार बदलायचे असून भाजपकडे पर्याय म्हणून पाहिले जात आहे, असा दावा त्यांनी केला.

केंद्रातील मोदी सरकारने देशाच्या विकासाला नवी दिशा दिली असून आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची प्रतिष्ठा वाढत असल्याचेही ढिल्लन यांनी सांगितले. पंजाबमध्येही २०२७ मध्ये भाजपला संधी मिळावी, अशी जनतेची इच्छा असल्याचा दावा त्यांनी केला.

भाजपने सर्व ११७ जागांवर स्वबळावर लढण्याची भूमिका स्पष्ट केल्याने पंजाबमधील आगामी विधानसभा निवडणुकीतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. विशेषतः भाजप आणि अकाली दलाच्या संबंधांवर या निर्णयाचा मोठा परिणाम होणार असून पंजाबच्या राजकारणात आता पुढील काळात नव्या आघाड्या आणि समीकरणांना वेग येण्याची शक्यता आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत