चाकणच्या समस्यांवर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये; ३१ ऑगस्टपर्यंत खड्डे बुजविण्याचे निर्देश

महाराष्ट्र

पुणे : चाकण परिसरातील वाढती वाहतूक कोंडी, रस्त्यांवरील खड्डे, अतिक्रमणे, कचरा व्यवस्थापन, पार्किंग आणि सुरक्षेच्या प्रश्नांवर आता प्रशासनाने ॲक्शन प्लॅन तयार केला आहे. चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी गठित उच्चस्तरीय समितीच्या कामकाजाचा आढावा घेताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी संबंधित सर्व शासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करून प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याच्या सूचना दिल्या.

शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीला खेड-आळंदीचे आमदार बाबाजी काळे, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव डॉ. राजेश देशमुख, पीएमआरडीए आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, उद्योजक आणि संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

चाकण हे मोठे औद्योगिक केंद्र असून येथे वाढती लोकसंख्या, औद्योगिक विस्तार आणि वाहनांची संख्या लक्षात घेता पायाभूत सुविधा आणि सुरक्षाव्यवस्था अधिक सक्षम करण्याची गरज आहे. त्यासाठी १०० अतिरिक्त सुरक्षा जवानांची नियुक्ती करण्याची कार्यवाही सुरू असून, आवश्यकतेनुसार नवीन पोलिस ठाणी उभारण्याबाबतही प्रक्रिया सुरू असल्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितले.

३१ ऑगस्टपर्यंत खड्डे बुजविण्याचे आदेश

चाकण परिसरातील रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत खड्डे आणि साईडपट्ट्यांची दुरुस्ती पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कामात दिरंगाई झाल्यास संबंधितांवर कारवाईचा इशारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिला आहे.

वाहतूक कोंडीची ठिकाणे, वाहतूक व्यवस्थापन आणि रस्त्यांची दुरुस्ती यावरही प्राधान्याने काम केले जाणार आहे. गर्दीच्या वेळेत जड वाहनांवर निर्बंध आणण्याबरोबरच औद्योगिक कंपन्यांच्या शिफ्टच्या वेळांमध्ये बदल करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

महिनाभरात अतिक्रमणे हटविणार

चाकण परिसरातील अतिक्रमणांचा प्रश्नही प्रशासनाने प्राधान्याने हाती घेतला आहे. येत्या शुक्रवारपासून अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करून महिनाभरात ती पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. अतिक्रमण कारवाईत कोणाचीही गय केली जाणार नसल्याचे सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केले.मात्र कारवाईदरम्यान नागरिक, उद्योजक, संस्था आणि लोकप्रतिनिधींनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

ट्रक पार्किंगसाठी जागा सुरू होणार

एमआयडीसी परिसरातील पार्किंगचा प्रश्न सोडविण्यासाठी उपलब्ध जागांचा योग्य वापर करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. एका आठवड्यात पार्किंगच्या जागा सुरू करून रस्त्यावर उभे राहणारे ट्रक तेथे हलविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.

१९ गावांसाठी कचरा प्रक्रिया प्रकल्प

चाकणमध्ये प्रवेश करताना रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात कचरा आणि प्लास्टिक दिसत असल्याने त्यावर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. एमआयडीसीशी चर्चा करून कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली असून, १९ गावे आणि एमआयडीसी क्षेत्रासाठी कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचे काम पुढे नेण्यात येत आहे.प्लास्टिक कचऱ्याच्या व्यवस्थापनावरही विशेष लक्ष दिले जाणार आहे.

दर शुक्रवारी आढावा बैठक

पुणे-चाकण औद्योगिक पट्ट्यातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी विविध विभागांच्या समन्वयातून अल्प, मध्यम आणि दीर्घकालीन उपाययोजनांचा ॲक्शन प्लॅन तयार करण्यात आला आहे. संबंधित विभागांची दर शुक्रवारी बैठक घेऊन उपाययोजनांच्या प्रगतीचा आढावा घेतला जाणार आहे.

वाहनांसोबतच पादचाऱ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन वॉकवे आणि सुरक्षित रस्त्यांना प्राधान्य दिले जाणार असल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनीही औद्योगिक पट्ट्यातील वाढते नागरिकरण आणि वाहतुकीचे प्रमाण लक्षात घेऊन पोलिस प्रशासनाकडून पायाभूत सुविधांचा विस्तार करण्यात येत असल्याचे सांगितले. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी अतिक्रमणे हटविणे आणि आवश्यक ठिकाणी रस्ते रुंदीकरण करण्यावर भर दिला जाणार आहे.

दरम्यान, बैठकीत उद्योजक तसेच वाहतूक, उद्योग आणि स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी चाकण परिसरातील विविध समस्या मांडल्या. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी संबंधित यंत्रणांकडून माहिती घेत या समस्या सोडविण्यासाठी सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत