मांड्या : कर्नाटकातील मांड्या जिल्ह्यातील श्रीरंगपट्टण येथील उक्कड मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाजप आमदाराच्या मुलीचा कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस उपनिरीक्षकासोबत (PSI) वाद झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मंदिराच्या गर्भगृहात जाण्यापासून रोखल्याने झालेल्या वादात आमदाराच्या मुलीने महिला PSI च्या कानशिलात लगावल्याचा आरोप आहे. या घटनेचा CCTV व्हिडिओही समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १२ ऑगस्ट रोजी रात्री भीम अमावस्येच्या उत्सवादरम्यान हा प्रकार घडला. स्थानिक भाजप आमदार सुरेश गौडा यांची मुलगी ऐश्वर्या गौडा दर्शनासाठी मंदिरात आली होती. यावेळी पोलिसांनी तिला गर्भगृहात जाण्यापासून रोखले. त्यावरून तिचा महिला PSI सविता पाटील यांच्यासोबत वाद झाला.
या घटनेच्या CCTV फुटेजमध्ये ऐश्वर्या गौडा आणि महिला पोलिसांमध्ये वाद होताना दिसत आहे. त्यानंतर ऐश्वर्या यांनी महिला PSI ला मारहाण केल्याचे दृश्यही समोर आल्याचे सांगितले जात आहे.
आमदार सुरेश गौडांकडून माफी
या घटनेवर आमदार सुरेश गौडा यांनी प्रतिक्रिया देताना मुलगी दर्शनासाठी मंदिरात गेली होती आणि तिने गर्भगृहात जाण्याची विनंती केली होती, असे सांगितले. मात्र, पोलिसांनी तिला आत जाण्याची परवानगी दिली नाही. एका सर्कल इन्स्पेक्टरला मात्र गर्भगृहात जाऊ दिल्याने तिने पुन्हा विनंती केली, असा दावा त्यांनी केला.
यावेळी महिला पोलिसाने मुलीला शिवीगाळ केल्याचे समजते. त्यानंतर दोघींमध्ये वाद आणि मारामारी झाल्याचे आमदारांनी म्हटले आहे. माझ्या मुलीने महिला पोलिसाच्या कानशिलात लगावल्याचा व्हिडिओ मी अद्याप पाहिलेला नाही. मात्र, या घटनेबद्दल मी माफी मागतो आणि मला याचे वाईट वाटते, असेही सुरेश गौडा यांनी स्पष्ट केले.
कर्तव्यावर असलेल्या महिला पोलिसासोबत झालेल्या या प्रकारामुळे कर्नाटकात चर्चेला उधाण आले असून, या प्रकरणात पोलिसांकडून पुढे कोणती कारवाई केली जाते, याकडे लक्ष लागले आहे.