मुंबई : “मराठीवर सक्ती करणारी नव्हे, तर मराठीवर भक्ती करणारी गर्दी आज येथे पाहायला मिळत आहे. जन्मभूमी उत्तर प्रदेश, बिहार किंवा अन्य राज्य असले तरी कर्मभूमी महाराष्ट्र आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या मराठी भाषेवर प्रेम करा,” असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
बोरिवली येथील कोरा केंद्र ग्राउंडवर २० हजार हिंदी भाषिक रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी व्यवहार भाषा प्रशिक्षणाचे उत्तीर्ण प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. यावेळी शिंदे बोलत होते. मराठी शिकलेल्या रिक्षा-टॅक्सी चालकांची मोठी गर्दी पाहून आनंद झाल्याचे सांगत त्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
आमदार प्रकाश सुर्वे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी साहित्यिक, भाषातज्ज्ञ, प्राचार्य, शिक्षक आणि मराठीप्रेमींना सोबत घेऊन हे आव्हानात्मक काम पूर्ण केल्याबद्दल शिंदे यांनी त्यांचे अभिनंदन केले.
‘मराठी भाषा तोडणारी नव्हे, जोडणारी’
“मराठी भाषा तोडणारी नाही, तर जोडणारी आहे. रिक्षा-टॅक्सीमध्ये प्रवाशाला ‘कुठे जायचे?’ एवढेच नव्हे, तर ज्येष्ठ नागरिकाला ‘हळू उतरा’ असे प्रेमाने म्हणता आले पाहिजे. प्रवाशांनीही चालकांशी मराठीत संवाद साधावा. त्यामुळे मराठीचा प्रचार-प्रसार वाढेल आणि चालकांचा व्यवसायही वाढेल,” असे शिंदे म्हणाले.
आपणही सुरुवातीच्या काळात रिक्षा चालवली असल्याचे सांगत शिंदे यांनी रिक्षा-टॅक्सी सेवा ही केवळ व्यवसाय नसून एक सेवाच असल्याचे नमूद केले. कोणताही व्यवसाय प्रामाणिकपणे करण्याचे आवाहन त्यांनी केले. प्रवाशांचे पैसे, दागिने किंवा मौल्यवान वस्तू सापडल्यानंतर त्या पोलिसांकडे जमा करणाऱ्या प्रामाणिक चालकांचेही त्यांनी कौतुक केले.
‘मुंबईवर आणि मराठीवर प्रेम करा’
मुंबईत राहणारा आणि मराठीवर प्रेम करणारा प्रत्येक मुंबईकर हा आपला नातेवाईक, मित्र आणि आपला माणूस आहे, अशी भावना ठेवण्याचे आवाहन शिंदे यांनी केले. कोकण मराठी साहित्य परिषदेसह मराठी शिकविणाऱ्या सर्वांचे त्यांनी अभिनंदन केले. पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या योगदानाचेही त्यांनी विशेष कौतुक केले.
आपण मुख्यमंत्री असताना मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्याचा निर्णय झाला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यास मान्यता दिल्याचे शिंदे यांनी सांगितले. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात सुमारे १ लाख ६० हजार जणांनी मराठी भाषा शिकली असून, ही अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.
चांगल्या कामात विघ्न आणणाऱ्यांना बळी न पडता सर्वांना सोबत घेऊन मुंबईचा विकास करण्याचे आवाहन करताना शिंदे म्हणाले, “मुंबई रोजीरोटी देणारी आहे; मुंबईवर आणि मराठीवर प्रेम करा.”
गोविंदा उत्सव आणि गणेशोत्सवही मोठ्या उत्साहात साजरे करून महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा पुढे नेण्याचे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमाला विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार प्रकाश सुर्वे, आमदार मुरजी पटेल, आमदार प्रा. मनिषा कायंदे, शिवसेना सचिव सिद्धेश कदम यांच्यासह शिवसेनेचे खासदार, आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच रिक्षा-टॅक्सी चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.