‘लेबल खोटं बोललं तरी ग्राहकाला किंमत मोजावी लागते’; तुकाराम मुंढेंचा भेसळखोरांना सज्जड इशारा

महाराष्ट्र

मुंबई : अन्न आणि औषध प्रशासनाच्या (FDA) धडाकेबाज कारवाईमुळे राज्यातील भेसळखोर आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. हॉटेल आणि धाबेचालकांपासून मिठाई, दूध विक्रेते तसेच बड्या कंपन्यांवरही कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या कारवाईचे नागरिकांकडून कौतुक होत असून, त्यांची या विभागातून लवकर बदली करू नये, अशी मागणीही जोर धरत आहे.

दरम्यान, तुकाराम मुंढे यांनी ‘एक्स’वर केलेल्या एका पोस्टमधून आगामी कारवाईचे स्पष्ट संकेत दिले आहेत. अन्नपदार्थांच्या पाकिटावरील चुकीची माहिती, खोटी लेबले आणि एक्सपायरी डेटच्या नियमांशी खेळ करणाऱ्यांना त्यांनी थेट इशारा दिला आहे.

तो केवळ नियमभंग नाही, ग्राहकांसोबतचा विश्वासघात’

तुकाराम मुंढे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, एखाद्या पाकिटावरील लेबल खोटे सांगत असेल, तरी त्याची किंमत ग्राहकाला मोजावी लागते. एक्सपायरी डेट ही केवळ पॅकिंगवर छापलेली शाई नसून, त्या उत्पादनाच्या सुरक्षिततेबाबत ग्राहकाला दिलेले वचन आहे.

पदार्थांमधील घटकांची पाकिटावर दिलेली माहितीही ग्राहकाला दिलेले एक प्रकारचे वचन आहे. हे वचन जाणूनबुजून मोडले किंवा माहितीमध्ये फेरफार केला, तर तो केवळ नियमांचा भंग नसून ग्राहकांसोबत केलेला विश्वासघात असल्याचे मुंढे यांनी स्पष्ट केले आहे.

‘दहशत निर्माण करण्यासाठी नियम नाहीत’

“आम्हाला कोणत्याही व्यवसायात भीती अथवा दहशत निर्माण करायची आहे म्हणून नियमावली तयार केलेली नाही,” असा स्पष्ट संदेशही मुंढे यांनी दिला आहे.

अन्नपदार्थ आणि औषधे विकली जात असताना ती योग्य आहेत का, त्यातील घटक योग्य आहेत का आणि ग्राहकांना दिलेली आश्वासने प्रामाणिकपणे पाळली जात आहेत का, हे सुनिश्चित करण्यासाठी नियमावली असल्याचे त्यांनी सांगितले.

ग्राहक आणि व्यापारी यांच्यात विश्वासाचे आणि पारदर्शक वातावरण निर्माण करणे हा नियमांचा उद्देश आहे. मात्र, ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ होत असेल किंवा नियमांचे जाणीवपूर्वक उल्लंघन केले जात असेल, तर प्रशासनाकडून कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराच या पोस्टमधून देण्यात आला आहे.

FDAची राज्यभर कारवाई सुरूच

तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली अन्न व औषध प्रशासनाकडून राज्यातील विविध भागांत तपासणी आणि कारवाई सुरू आहे. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आगामी काळात लेबलिंग, एक्सपायरी डेट आणि उत्पादनातील घटकांबाबत आणखी कठोर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.‘ग्राहकांच्या आरोग्याशी खेळाल तर गय केली जाणार नाही’, असा स्पष्ट संदेशच मुंढे यांच्या भूमिकेतून मिळत असल्याने त्यांच्या पुढील कारवाईकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत