डीजे बंदीवरून संजय राऊतांचा फडणवीसांना थेट सवाल; धोरणात्मक निर्णय घेण्याची हिंमत आहे का?

महाराष्ट्र

मुंबई : नागपूरमध्ये डीजेवर बंदी घालण्यात आली असताना पुण्यात मात्र डीजे बंदीच्या मुद्द्यावर संभ्रम कायम आहे. याच मुद्द्यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. “डीजे बंदी हा एका शहराचा नव्हे, तर संपूर्ण राज्याचा धोरणात्मक विषय आहे. असा निर्णय घेण्याची हिंमत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात आहे का?” असा थेट सवाल राऊत यांनी केला.

कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत बोलताना राऊत म्हणाले की, पुण्यात भाजपची सत्ता आहे. नागपूरचे पूर्वीचे आयुक्त सध्या पुण्यात आहेत. ते मुख्यमंत्र्यांचे लाडके अधिकारी आहेत, मग डीजे बंदीचा निर्णय का घेतला जात नाही? डीजे आणि लेझरमुळे नागरिकांच्या मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होतो आणि लोकांना त्रास होतो. त्यामुळे त्यावर बंदी घालणे हा धोरणात्मक निर्णय असल्याचे त्यांनी सांगितले.

“मुख्यमंत्री कायद्याच्या चौकटीत निर्णय घेऊ म्हणतात. हे कधी कायदा पाळायला लागले? सरकार लोकशाहीवादी आणि लोकभावनेचा आदर करणारे असेल, तर लोकांची भूमिका लक्षात घेऊन निर्णय का घेत नाही? नागपूरला एक निर्णय आणि पुण्याला दुसरा निर्णय, याला कायद्याची चौकट म्हणता येणार नाही,” असा टोलाही राऊत यांनी लगावला.

“भाजपचा खेळ संपला”

कोल्हापूरमधील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या मुद्द्यावरूनही राऊत यांनी सरकारला लक्ष्य केले. “मुख्यमंत्र्यांनी मुंबईहून कोल्हापूरला रस्त्याने यावे. मग त्यांना रस्त्यांचे जाळे दिसेल. नवी मुंबई विमानतळावर जाण्यासाठी मला काल अडीच तास लागले. हे त्यांचे इन्फ्रास्ट्रक्चर आहे,” अशी टीका त्यांनी केली.“भाजपवाल्यांवर काय विश्वास ठेवता? त्यांचा खेळ संपलेला आहे. २०२९ पूर्वीच त्यांचा खेळ संपला आहे,” असा दावा राऊत यांनी केला.

पंतप्रधानांवरही टीकास्त्र

जीडीपी वाढीच्या मुद्द्यावरूनही संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. “पंतप्रधान एखादा दावा करतात तेव्हा जनतेचा त्यांच्या बोलण्यावर विश्वास असायला हवा. मात्र दुर्दैवाने पंतप्रधानांची जागतिक ओळख थापेबाज अशी झाली आहे. इतके खोटे बोलले गेले की देशालाही ते ऐकण्याची सवय लागली,” असा आरोप त्यांनी केला.

“शेतकरी आत्महत्या थांबल्या का?”

जीडीपी वाढीचा दावा करताना देशातील सामान्य जनतेच्या जीवनमानाकडेही पाहिले पाहिजे, असे राऊत म्हणाले. “जीडीपी वाढला म्हणजे अर्थव्यवस्था मजबूत झाली, असे सांगितले जाते. मात्र शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या का? रोजगार किती निर्माण झाले? कोट्यवधी बेरोजगार रस्त्यावर आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणे हे जीडीपी वाढल्याचे लक्षण नाही,” असे ते म्हणाले.

“जनतेचे राहणीमान, आर्थिक स्थैर्य सुधारले पाहिजे. मात्र आजही तरुण आंदोलन करत आहेत, रस्त्यांवर खड्डे आहेत. निवडणुका आल्यावर लाडक्या बहिणीला पैसे देणे हे जीडीपी वाढल्याचे लक्षण नाही,” अशी टीकाही राऊत यांनी केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत