श्रीनगर विमानतळावर इंडिगो विमानाचा पोलला धडक; मोठा अपघात थोडक्यात टळला

महाराष्ट्र

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी सकाळी इंडिगोच्या विमानाला अपघात झाला. नवी मुंबईहून श्रीनगरला पोहोचलेले इंडिगोचे 6E 225 (VT-NOG) हे विमान लँडिंगनंतर पार्किंग बे क्रमांक ६ कडे जात असताना व्हिज्युअल डॉकिंग गाइडन्स सिस्टम (VDGS) च्या पोलला धडकले. सुदैवाने या घटनेत विमानातील सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्स सुरक्षित असून कोणालाही दुखापत झालेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी सुमारे ९.०२ वाजता हे विमान श्रीनगर विमानतळावर दाखल झाले. पार्किंग बेच्या दिशेने जात असताना विमानाचा VDGS पोलला धक्का बसला. या पोलवर विमानाच्या पार्किंगसाठी लेझर आणि कॅमेरा सेन्सर्स बसवलेले असतात. या धडकेत विमानाच्या पुढील भागाचे म्हणजेच नोज सेक्शनचे किरकोळ नुकसान झाले आहे.

ब्रेकिंग सिस्टम फेल झाल्याची चर्चा

विमानाचे नियंत्रण सुटल्याने ही धडक झाल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, विमानाची ब्रेकिंग सिस्टम फेल झाल्याची चर्चा सुरू असून, या दाव्याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी संबंधित विमान वाहतूक अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे.

प्रवाशांना मॅन्युअल पायऱ्यांनी उतरवले

घटनेची माहिती मिळताच विमानतळ प्रशासनाने तातडीने बचावकार्य सुरू केले. विमानातील सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्सना मॅन्युअल पायऱ्यांच्या सहाय्याने सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झालेली नाही.

दरम्यान, या घटनेचा विमानतळावरील नियमित कामकाजावर मोठा परिणाम झालेला नसून उड्डाणांची वाहतूक सुरळीत सुरू असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. प्रवाशांची सुरक्षा ही प्राथमिकता असल्याचेही विमानतळ प्रशासनाने सांगितले.

एक दिवस आधीही इंडिगोचे विमान डायव्हर्ट

इंडिगोच्या विमानाशी संबंधित आणखी एक घटना गुरुवारी समोर आली होती. दोहाहून बंगळुरूकडे जाणाऱ्या 6E 1302 या विमानाच्या पायलट-इन-कमांडची अचानक प्रकृती बिघडल्याने विमानाचे मस्कट येथे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले होते. पायलटवर उपचार करण्यात आल्यानंतर प्रवाशांना पुढील प्रवासासाठी दुसऱ्या विमानाची व्यवस्था करण्यात आली होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत