झिशान सिद्दीकी मुंबई राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी; सिद्धार्थ कांबळेंची प्रदेश उपाध्यक्षपदी वर्णी!

महाराष्ट्र

मुंबई : मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आमदार झिशान सिद्दीकी यांनी आज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारला. दरम्यान, या नियुक्तीमुळे नाराज होऊन मुंबई कार्याध्यक्षपदाचा राजीनामा देणारे सिद्धार्थ कांबळे यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई राष्ट्रवादीतील संघटनात्मक बदलांबरोबरच नाराजी नाट्यावरही पडदा पडल्याचे चित्र आहे.

मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी आमदार झिशान सिद्दीकी यांची निवड झाल्यानंतर आज त्यांनी अधिकृतपणे पदभार स्वीकारला. मात्र, या नियुक्तीवरून मुंबई बँकेचे अध्यक्ष आणि पक्षाचे मुंबई कार्याध्यक्ष तसेच दिवंगत अजितदादा पवार यांचे विश्वासू सहकारी सिद्धार्थ कांबळे नाराज झाले होते. त्यांनी आपल्या मुंबई कार्याध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.

या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्यासोबत कांबळे यांची चर्चा झाली. या चर्चेनंतर त्यांना महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्याचा निर्णय घेण्यात आला. उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. त्यामुळे पक्षांतर्गत नाराजी दूर करण्याचा प्रयत्न यशस्वी झाल्याचे मानले जात आहे.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री नवाब मलिक, माजी मंत्री धनंजय मुंडे, आमदार सना मलिक-शेख, आमदार प्रताप पाटील चिखलीकर, महिला प्रदेशाध्यक्षा वैशाली नागवडे, युवक प्रदेशाध्यक्ष निखिल ठाकरे, मुंबई कार्याध्यक्ष शिवाजीराव नलावडे, प्रदेश उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, प्रदेश प्रवक्ते सूरज चव्हाण, मुंबई महिला अध्यक्षा आरती साळवी यांच्यासह पक्षाचे जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत