मुंबई : न्यायालयाच्या दारात गोळीबार होणे हे राज्यातील अराजकतेचे लक्षण आहे. गुन्हेगारांना कायद्याचे किंवा पोलिसांचे भय राहिलेले नाही. राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजले असतानाही गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे वास्तव मान्य करायला तयार नाहीत. त्यांना कोणत्याही गोष्टीचे गांभीर्य नाही. फडणवीसांना महाराष्ट्राचा तालिबान करायचा आहे का, असा संतप्त सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.
शिवशंभू स्वराज्य संघटनेच्या वतीने महाड येथे आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आलेल्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ऐतिहासिक चवदार तळ्याला भेट देऊन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. तसेच पाचाड येथे राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या समाधीस्थळी जाऊन मानवंदना दिली. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्था, मुंबई-गोवा महामार्ग, कोकणातील पर्यावरण आणि दुष्काळाच्या प्रश्नांवरून महायुती सरकारवर जोरदार टीका केली.
मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर निशाणा साधताना सपकाळ म्हणाले की, या महामार्गाचा मोठा गाजावाजा करण्यात आला; मात्र तब्बल १२ वर्षे उलटूनही महामार्गाचे काम पूर्ण झालेले नाही. महामार्गाच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून, लाडक्या ठेकेदारांसाठी कोकणातील जनतेला गेल्या १२ वर्षांपासून वेठीस धरले जात आहे. मुंबई-गोवा महामार्ग हा नितीन गडकरी यांच्या नाकर्तेपणाचा उत्तम नमुना असल्याची टीका त्यांनी केली.
अदानी-अंबानींसाठी कोकणच्या पर्यावरणाचा बळी?
कोकणातील हायड्रो प्रकल्प आणि खाणींच्या मुद्द्यावरूनही सपकाळ यांनी भाजप सरकारला लक्ष्य केले. अदानी-अंबानी यांच्या प्रकल्पांना सरकारकडून मान्यता दिली जात असून, त्यामुळे कोकणच्या पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होत आहे. प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जात आहे. अनेक प्रकल्पांमधून रसायनयुक्त पाणी नद्यांमध्ये सोडले जात असल्याने जलप्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. उद्योगपतींच्या हितासाठी भाजप महायुती सरकार कोकणची जनता आणि पर्यावरणाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
कोकणात उद्योग आणि प्रकल्प आले पाहिजेत, स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळाला पाहिजे आणि कोकणचा विकासही झाला पाहिजे. मात्र, हे प्रकल्प कोकणच्या हिताचे नसून कोकणच्या अस्तित्वावरच घाला घालणारे आहेत. त्यामुळे पर्यावरणाचा विनाश करणारे प्रकल्प थांबवले पाहिजेत, अशी भूमिका सपकाळ यांनी मांडली.
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पाच हजारांची मदत अजूनही मिळेना!
राज्यातील भीषण दुष्काळाच्या प्रश्नावरूनही सपकाळ यांनी सरकारला धारेवर धरले. यावर्षी राज्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. चारा आणि पाण्याची समस्या गंभीर बनली असून, अनेक भागांत पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. सरकारने ३१० तालुके दुष्काळग्रस्त जाहीर केले असले तरी त्यातही भेदभाव करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
दुष्काळ जाहीर करून सरकारने मदतीची घोषणाही केली होती. दिवाळीपूर्वी सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पाच हजार रुपये जमा होतील, असा दावा करण्यात आला होता. मात्र, दिवाळी संपूनही लाखो शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळालेली नाही. घोषणांचा गाजावाजा करणाऱ्या महायुती सरकारने प्रत्यक्ष मदतीपासून शेतकऱ्यांना वंचित ठेवून त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.