सेवाधामला एक मूठ धान्य उपक्रमातून तीनशे किलो धान्य भेट

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथील सेवाधाम मतिमंद निवासी विद्यालयातील विशेष विद्यार्थ्यांसाठी चाकण येथील विद्या व्हॅली इंटरनॅशनल स्कूल च्या विद्यार्थी व शिक्षकांनी एक मूठ धान्य उपक्रम राबवून या उपक्रमाच्या माध्यमातून तीनशे किलो धान्य सेवाधाम विद्यालयास सुपूर्द केले.

पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथील सेवाधाम मतिमंद निवासी विद्यालयातील विशेष विद्यार्थ्यांसाठी विद्याव्हॅली इंटरनॅशनल स्कूलच्या सेक्रेटरी रोहिणी देशमुख यांनी एक मूठ धान्य ही संकल्पना मांडली. या संकल्पनेला सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत तांदूळ, गहू व तूरडाळ असे तीनशे किलो धान्य जमा केले असून सर्व धान्य सेवाधाम कडे सुपूर्त करण्यात आले.

यावेळी विद्याव्हॅली इंटरनॅशनल स्कूल च्या मुख्याध्यापिका स्वाती रणदिवे, को ऑर्डिनेटर मोनाली नलावडे, शिक्षिका अंजली विखे व सीता नाईकवडे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

दरम्यान सर्वांनी सेवाधाम विद्यालयास भेट देऊन विशेष विद्यार्थ्यांना शिकविण्याची पद्धत व त्यांचे उपक्रम यांची माहिती घेत विशेष विद्यार्थ्यांचे कलागुण पाहून रोहिणी देशमुख यांनी सेवाधामच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी सेवाधामचे मुख्याध्यापक पवन कट्यारमल यांनी सर्वांचे स्वागत केले तर मानसशास्त्रज्ञ नृसिंह कुलकर्णी यांनी सर्वांचे आभार मानले.