भरधाव टिपरने मोटारसायकलला धडक दिली आणि चालक अपघातानंतर पसार, शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

क्राईम शिरूर तालुका

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील मलठण गावाजवळ गुरुवारी (दि. ११ एप्रिल) रात्री साडेआठच्या सुमारास भरधाव वेगात आलेल्या आयशर टिपरने मोटारसायकलला जोरदार धडक दिली. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोटारसायकलचे मोठे नुकसान झाले असून, संबंधित टिपर चालक अपघातानंतर घटनास्थळावरून पळून गेला.

या प्रकरणी प्रणव चंद्रकांत गाढवे (वय २१), रा. संविदणे, ता. शिरूर यांनी शिरूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, प्रणव गाढवे हे त्यांच्या हिरो कंपनीच्या मोटारसायकल (क्र. MH12. VU .2479) वरुन मित्र प्रशांत विजय पवार याला सोबत घेऊन मलठणहून रांजणगावकडे कामासाठी जात होते. दरम्यान मलठण गावातील दंडवते वस्तीजवळ समोरून भरधाव वेगाने आलेल्या आयशर टिपर क्र. MH .12 .WJ .6168) ने अचानक आडवे येत त्यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली.

या अपघातात दोघांनाही शारीरिक दुखापत झाली नसली तरी मोटारसायकलचे समोरील चाकाचे मॅगव्हील व इतर भागांचे नुकसान झाले आहे. अपघातानंतर टिपर चालक घटनास्थळावर न थांबता पळून गेला.

पाठीमागून पाठलाग करत टिपरचा माग काढला असता तो केशर पॉईंट येथे उभा सापडला. परंतु चालकाने तिथेही टिपर सोडून पळ काढला. पुढील चौकशीत टिपरचे मालक राहुल खरपुडे (मो. 9823699191) यांनी संबंधित वाहनावर दादाभाऊ डांगे (रा. सोनेसांगवी, ता. शिरूर) हा चालक म्हणून काम करत असल्याची माहिती दिली.

शिरूर पोलिसांनी आरोपी चालक दादाभाऊ डांगे याच्याविरोधात अपघाताची तक्रार दाखल केली असून पोलीस हवालदार कोथळकर यांनी गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास पो. ह. गरकळ हे करत आहेत.