अखंड महाराष्ट्राच्या कुलदैवताच्या नगरीत काठ्यांची हाणामारी! भाविकांत भीतीचे वातावरण

क्राईम महाराष्ट्र

जेजुरी (पुणे): अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत मानल्या जाणाऱ्या श्री खंडोबा देवाच्या जेजुरी गड परिसरात आज घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे भाविकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. भक्ती, भंडारा आणि ‘येळकोट येळकोट’च्या जयघोषासाठी ओळखल्या जाणाऱ्या या पवित्र स्थळी किरकोळ वादातून थेट काठीहाणामारी झाल्याने जेजुरीची प्रतिमा मलीन झाली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, जेजुरी गडाच्या पायथ्याशी असलेल्या एका दुकानावर भंडारा व पूजेचे साहित्य खरेदी करताना भाविक आणि दुकानदार यांच्यात वाद झाला. सुरुवातीला शाब्दिक वादाने सुरुवात झालेल्या या प्रकाराने काही क्षणांतच उग्र रूप धारण केले. संतप्त दुकानदार व त्यांच्या साथीदारांनी भाविकांवर काठ्यांनी हल्ला केल्याचा आरोप करण्यात येत असून, भाविकांनीही स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे. यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये काही जण हातात दांडके घेऊन एकमेकांवर तुटून पडताना स्पष्टपणे दिसत आहेत. या गोंधळात महिला भाविक आणि लहान मुले घाबरून पळताना दिसल्याने देवस्थान परिसरातील सुरक्षेचा मुद्दा अधिक गंभीर बनला आहे. दर्शनासाठी आलेल्या हजारो भाविकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.

घटनेची माहिती मिळताच जेजुरी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र, देवस्थान परिसरात उघडपणे झालेली मारहाण ही व्यवस्थापन आणि सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत चिंताजनक बाब असल्याची भावना भाविकांकडून व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, जेजुरी देवस्थान समितीने या घटनेचा तीव्र निषेध केला असून, भाविकांना त्रास देणाऱ्या संबंधित दुकानदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. गरज पडल्यास संबंधित दुकानदारांचे परवाने रद्द करण्यात यावेत, अशी स्पष्ट भूमिका देवस्थान समितीने घेतली आहे.

जेजुरी हे केवळ धार्मिक स्थळ नसून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि धार्मिक ओळखीचे प्रतीक आहे. अशा पवित्र ठिकाणी भाविकांची सुरक्षितता, शिस्त आणि श्रद्धेचे वातावरण टिकवणे अत्यावश्यक असून, या घटनेनंतर प्रशासन व देवस्थान व्यवस्थेने ठोस आणि कठोर पावले उचलावीत, अशी मागणी सर्व स्तरांतून केली जात आहे.