मुंबई: शहरातील कफ परेड भागातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २० वर्षीय मूकबधिर तरुणीवर तिच्या स्वतःच्या वडिलांकडून लैंगिक अत्याचार केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये पीडित मुलीने तिच्या आजीकडे पोट दुखत असल्याची तक्रार नोंदवली. तिला मुंबईतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे वैद्यकीय तपासणीत तिच्या गर्भात तब्बल पाच महिन्यांचा गर्भ असल्याचे उघड झाले.
रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना माहिती दिली. फॉरेन्सिक तपासणीनंतर २७ जानेवारी रोजी प्राप्त झालेल्या अहवालात मुलीच्या गर्भातील डीएनए तिच्या वडिलांच्या डीएनएशी जुळत असल्याचे सिद्ध झाले. यानंतर ३ फेब्रुवारी रोजी पोलिसांनी पीडित मुलीच्या वडिलांना अटक केली आहे.
पोलिसांनी सांगितले की, अत्याचाराची घटना मार्च ते सप्टेंबर २०२५ दरम्यान घडली होती. २२ सप्टेंबर २०२५ रोजी गुन्हा नोंदवण्यात आला, मात्र वडिलांनी एफआयआर दाखल करण्यास नकार दिला. मुलगी मूकबधिर असल्यामुळे पोलिसांना तिचा जबाब नोंदवण्यात अडचणी येत होत्या.
तपासादरम्यान, पीडित मुलीला अनेक व्यक्तींचे फोटो दाखवले गेले. यापैकी एका १६ वर्षीय मुलाला आणि ३२ वर्षीय पुरुषाला अटक करण्यात आली. एकूण १७ व्यक्तींचे डीएनए आणि रक्ताचे नमुने घेण्यात आले, ज्यात पीडित मुलीचे वडील, कुटुंबातील सदस्य आणि शेजारी यांचा समावेश होता.डीएनए अहवालानंतर स्पष्ट झाले की, या घटनेत मुलीच्या वडिलांचा सहभाग आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.