पित्याचा हैवानपणा! संशयातून मुलींवर अत्याचार; एकीचा मृत्यू, अनुजा मृत्यूच्या दारातून परत”

क्राईम

बनपुरी: बनपुरी येथे घडलेल्या एका हृदयद्रावक आणि संतापजनक घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. चोरीच्या संशयावरून एका वडिलांनी स्वतःच्या मुलींवर अमानुष अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला असून, या घटनेत एका चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

या प्रकरणातील ११ वर्षांची अनुजा गंभीर जखमी अवस्थेत आढळली होती. तिला तातडीने आटपाडी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात दाखल करताना ती बेशुद्ध आणि अत्यंत अशक्त अवस्थेत होती. तिच्या हात-पायांना बांधल्यामुळे त्वचेवर खोल जखमा झाल्या होत्या, तसेच शरीरावर अनेक ठिकाणी मारहाणीच्या खुणा आणि रक्तस्त्राव दिसून येत होता.

अनुजाची गंभीर अवस्था पाहून डॉक्टरांचे पथकही क्षणभर हादरले, मात्र त्यांनी तात्काळ उपचार सुरू केले. जखमा स्वच्छ करण्यासाठी लहान शस्त्रक्रिया करण्यात आली, तसेच संसर्ग टाळण्यासाठी आवश्यक औषधोपचार देण्यात आले. तिच्या हात-पायांना बँडेज करून तिला सतत वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आले.

डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांमुळे अनुजाचा जीव वाचवण्यात यश आले असून, सध्या तिची प्रकृती स्थिर आहे आणि ती धोक्याबाहेर असल्याची दिलासादायक माहिती समोर आली आहे. मात्र तिच्या शरीरावरील जखमा पूर्णपणे बऱ्या होण्यासाठी अजून काही दिवस लागणार आहेत.या अमानुष घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी आरोपी वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. समाजमन सुन्न करणाऱ्या या घटनेमुळे बालसुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.