पुणे: पुण्यातील पाषाण रोड–पंचवटी–एनसीएल परिसरात मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या एका 73 वर्षीय महिलेचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आशा विजयकुमार पाटील (वय 73) असे मृत महिलेचे नाव असून, 24 जानेवारी रोजी पहाटे ही घटना घडली.
दररोजप्रमाणे पहाटे सुमारे 5.30 वाजता मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या आशा पाटील सकाळी घरी परतल्या नाहीत. सकाळी 7 वाजूनही त्या न परतल्याने कुटुंबीयांनी शोध सुरू केला. दरम्यान, एनसीएलजवळील आसरा मंदिर परिसरात एका वृद्ध महिलेचा अपघात झाल्याचे संदेश व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हायरल झाले. फोटो पाहताच कुटुंबीयांनी आशा पाटील असल्याची ओळख पटवली.
अपघातानंतर स्थानिक नागरिक व सायकलस्वारांनी मदत करत 108 रुग्णवाहिकेद्वारे त्यांना ससून जनरल रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
मृत महिलेचा मुलगा अतुल पाटील यांनी हा अपघात निष्काळजी वाहनचालकामुळे झाल्याचा आरोप केला आहे. घटनास्थळी ब्रेकचे कोणतेही चिन्ह नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच अपघातानंतर वाहन चालक घटनास्थळावरून पळून गेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी चतुशृंगी पोलिस ठाण्यात हिट अँड रनचा गुन्हा दाखल करण्यात आला असून भारतीय दंड संहिता व मोटार वाहन कायद्यांतर्गत एफआयआर नोंदवण्यात आली आहे. पोलिसांकडून परिसरातील मुख्य रस्ते व चौकांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून आरोपी वाहनाचा शोध सुरू आहे, अशी माहिती तपास अधिकारी अमोल धस यांनी दिली.दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून नियमित मॉर्निंग वॉक करणाऱ्या आणि सामाजिकदृष्ट्या सक्रिय असलेल्या आशा पाटील यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.