दिल्ली: दिल्लीमध्ये एका २९ वर्षीय महिलेला नवऱ्याच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली. या महिलेने आपल्या ३२ वर्षीय नवऱ्याची हत्या केली. त्यानंतर या घटनेला तिने आत्महत्या असल्याचे सांगत बनाव रचला. ही घटना रविवारी संध्याकाळी दिल्लीतील निहाल विहार परिसरात घडली. नवरा शरीरसुख देऊन खूश करू शकत नव्हता त्यामुळे या महिलेने त्याची हत्या केल्याची धक्कादायक माहिती पोलिस तपासातून उघड झाली.
पोलिसांनी या महिलेच्या फोनचा सर्च हिस्ट्री तपासली तेव्हा ती एखाद्या व्यक्तीला मारून कसे टाकायचे? हे मार्ग शोधत असल्याचे समोर आले. फरजाना खान असं आरोपी महिलेचे नाव आहे. पोलिस चौकशीदरम्यान या महिलेने नवऱ्याची हत्या केल्याची कबुली दिली. मोहम्मद शाहिद उर्फ इरफान असं हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. नवरा शरीरसुख देऊ शकत नसल्यामुळे फरजानाने हे भयंकर कृत्य केले.
फरजाना आणि शाहिद हे उत्तर प्रदेशच्या बरेलीवरून दिल्लीत आले होते. दोघांच्या लग्नाला काही वर्षेच झाले होते. पण फरजाना या लग्नापासून खूश नव्हती. तिने पोलिसांना सांगितले की, शाहिद तिला शारीरिक सुख देऊ शकत नव्हता. त्याला ऑनलाईन जुगार खेळण्याची सवयी लागली होती त्यामुळे कुटुंबावर कर्जाचे ओझे होते. फरजानाचे तिच्याच नवऱ्याच्या चुलत भावासोबत प्रेमसंबंध होते. तो बरेलीमध्ये राहत होता.
रविवारी संध्याकाळी, संजय गांधी रुग्णालयातून पोलिसांना फोन आला की एका व्यक्तीला मृतावस्थेत आणण्यात आले आहे. शाहिदचा मृतदेह घेऊन रुग्णालयात त्याच्या चुलत भाऊ आला होता. त्याने पोलिसांना सांगितले की, ‘शाहिदने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली.’ परंतु त्याच्या शरीरावर तीन जखमा पाहून पोलिसांना संशय आला. पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, ‘पत्नीने आम्हाला सांगितले की जुगाराशी संबंधित कर्जामुळे तो तणावाखाली होता आणि त्याने स्वतःवर चाकूने वार केले. परंतु सोमवारी, पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये ही हत्या असल्याचे उघड झाले.
संशय वाढत असताना पोलिसांनी फरझानाचा फोन तपासला तेव्हा त्यांना धक्का बसला. कारण पोलिसांना तिच्या मोबाईलमध्ये इंटरनेट सर्च हिस्ट्रीमध्ये ‘एखाद्याला झोपेच्या गोळ्या देऊन मारण्याचे मार्ग’, ‘चॅट हिस्ट्री कशी डिलीट करायची?’ हे दिसन आले. हे पुरावे समोर ठेवून पोलिसांनी फरझानाची कसून चौकशी केली तेव्हा तिने नवऱ्याच्या हत्येची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी तिच्याविरोधात गुन्हा दाखल करत अटक केली.