भाजप प्रवक्त्याचा कॉल अन् काळ्या फॉर्च्युनर एसयूव्हीचा थरारक पाठलाग

क्राईम महाराष्ट्र

धुळे: धुळे तालुका पोलिसांनी श्रीरामपूर येथील खूनप्रकरणातील फरार आरोपीला अटक करण्यात यश मिळवले आहे. या कारवाईत भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते अजित चव्हाण यांनी ११२ या आपत्कालीन क्रमांकावर केलेल्या फोनमुळे पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली आणि आरोपीपर्यंत पोहोचणे शक्य झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, अजित चव्हाण हे एका अंत्यविधीसाठी धुळे येथे आले होते. त्यावेळी मालेगावकडून येणारी काळ्या रंगाची, बिननंबरची आणि काळ्या काचा असलेली चारचाकी संशयास्पद वेगाने जात असल्याचे त्यांच्या लक्षात आले. वाहनाची हालचाल संशयास्पद वाटल्याने त्यांनी तात्काळ ११२ या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधून वाहनाबाबत सविस्तर माहिती दिली आणि ते थांबवण्याची विनंती केली.

माहिती मिळताच धुळे तालुका पोलीस ठाण्याचे पथक सतर्क झाले. आर्वी परिसरात नाकाबंदी करण्यात आली. हेड कॉन्स्टेबल विलास बागुल यांनी संबंधित वाहन अडवण्याचा प्रयत्न केला असता चालकाने वाहन विरुद्ध दिशेला वळवून पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी गाडीतून एक व्यक्ती खाली उतरून पळू लागला. संशय अधिक बळावल्याने पोलिसांनी तत्काळ पाठलाग करून त्या व्यक्तीस पकडले.

जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी १८ फेब्रुवारी रोजी दिलेल्या माहितीनुसार, पकडलेला आरोपी राहुल धुमाळ (रा. शिरसगाव, ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) असून तो श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात दाखल खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी आहे. आरोपीला ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी श्रीरामपूर पोलिसांच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, श्रीरामपूर पोलिसांचे पथक धुळ्याकडे रवाना झाले आहे.

या सिनेस्टाईल कारवाईनंतर काही काळ परिसरात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवली. या घटनेतून धुळे तालुका पोलिसांची तत्परता आणि नागरिक-पोलिस समन्वय अधोरेखित झाला आहे.

गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी नागरिकांनी कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. नागरिकांच्या जागरूकतेमुळे गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपीला अटक शक्य झाल्याची नोंद पोलिसांनी केली आहे.