अमेरिका–इस्त्राईल–इराण युद्ध थांबून शांतता प्रस्थापित व्हावी; हर्षवर्धन सपकाळ

महाराष्ट्र

मुंबई: हर्षवर्धन सपकाळ यांनी अमेरिका, इस्त्राईल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे निर्माण झालेल्या जागतिक परिस्थितीबाबत चिंता व्यक्त करत हे युद्ध लवकर संपून आशियात शांतता निर्माण व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष सपकाळ यांनी मुंबईतील इराणच्या वाणिज्य दूतावासाला भेट देऊन सईद रझा मोसायब मोतलाघ यांच्याशी चर्चा केली. या भेटीत प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस धनंजय शिंदे आणि सामाजिक कार्यकर्ते फिरोज मिठीबोरवाला उपस्थित होते.

भेटीनंतर माध्यमांशी बोलताना सपकाळ म्हणाले की, या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम जगभर होत असून भारतातही गॅस व इंधन तुटवड्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यामुळे युद्ध लवकर थांबणे अत्यावश्यक आहे.यावेळी त्यांनी अयातुल्ला अली खामेनी यांच्या निधनाबद्दल तसेच हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या सैनिक, नागरिक, विशेषतः शाळकरी मुली आणि शिक्षकांप्रती शोक व्यक्त केला. तसेच इराणच्या जनतेशी एकात्मता दर्शवत संवेदना व्यक्त केल्या.

तासाभर चाललेल्या चर्चेत भारत-इराण यांच्यातील प्राचीन सभ्यतागत संबंध, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि त्याचा मराठी भाषा व साहित्यावर झालेला प्रभाव यावरही चर्चा झाली. तसेच खंडित झालेली इंधन पुरवठा साखळी लवकर पूर्ववत व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.या प्रसंगी सईद रझा मोसायब मोतलाघ यांनी सध्याच्या युद्धपरिस्थितीचा आढावा देत इराणी जनतेने दाखविलेल्या धैर्याचे कौतुक केले.भेटीदरम्यान हर्षवर्धन सपकाळ यांनी मोतलाघ यांना महात्मा गांधी यांचे आत्मचरित्र भेट दिले.