शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्याविरोधात FIR चे आदेश; पोक्सो विशेष न्यायालयाचा निर्णय

क्राईम महाराष्ट्र

मुंबई: ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्या अडचणी वाढल्या असून एडीजे अत्याचार आणि पोक्सो विशेष न्यायालयाने त्यांच्या विरोधात एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात त्यांच्यासह शिष्य स्वामी मुकुंदानंद गिरी यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

शाकुंभरी पीठाधीश्वर आशुतोष ब्रह्मचारी यांनी कलम १७४ (४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती. संबंधित प्रकरणात आश्रमातील दोन अल्पवयीन मुलींचे जबाब व्हिडिओग्राफीद्वारे न्यायालयात नोंदवण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने पोलिसांना तत्काळ एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले.

आशुतोष ब्रह्मचारी हे श्री कृष्ण जन्मभूमि मुक्ति निर्माण ट्रस्ट शी संबंधित असून त्यांनी झुंसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यास नकार दिल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली.

आरोपांनुसार, आश्रमातील एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा दावा करण्यात आला असून यासंदर्भात एक सीडीही न्यायालयात सादर करण्यात आली. आदेशानंतर “आम्हाला न्यायालयाकडून न्याय मिळाला,” अशी प्रतिक्रिया आशुतोष ब्रह्मचारी यांनी दिली. तसेच प्रयागराजहून वाराणसीपर्यंत सनातन यात्रा काढून सत्य समोर आणणार असल्याचे त्यांनी सांगितले.दरम्यान, न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांकडून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू होणार आहे.