पुणे: पुण्यात सायबर चोरट्यांनी अत्यंत धक्कादायक आणि चकित करणारी फसवणूक करत एका ८२ वर्षीय सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकाला तब्बल १० कोटी ७५ लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. सायबर चोरट्यांनी थेट “वर्चुअल कोर्ट” तयार करून डिजिटल अरेस्टची धमकी देत ही फसवणूक केल्याने खळबळ उडाली आहे.या प्रकरणी पुणे सायबर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
जेट एअरवेज प्रकरणाची धमकी देत जाळ्यात ओढले
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार २३ जानेवारी ते ३१ जानेवारी या कालावधीत घडला. फिर्यादी हे पुण्यातील भांडारकर रोड परिसरात राहणारे, उच्चशिक्षित आणि सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिक आहेत.२३ जानेवारी रोजी त्यांना एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. फोनवरून बोलणाऱ्या व्यक्तीने,“देशभर गाजलेल्या जेट एअरवेजचे माजी प्रमुख नरेश गोयल यांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात तुमचे नाव निष्पन्न झाले आहे. तुमच्या आधार कार्डवर बँक खाते उघडून गैरव्यवहार झाले आहेत,” अशी धमकी दिली.यानंतर पुन्हा फोन करत सायबर चोरट्यांनी,“तुमच्या आधार कार्डवरून २४ बँक खात्यांमध्ये पैसे ट्रान्स्फर झाले असून या प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे. दोषी आढळल्यास ७ ते ९ वर्षांचा कारावास होऊ शकतो,” असे सांगत मानसिक दबाव वाढवला.
बनावट CBI अधिकारी, वर्चुअल कोर्ट आणि ‘न्यायाधीश’
दबावाखाली फिर्यादींकडून पॅन कार्ड, आधार कार्ड आणि बँक खात्याची माहिती घेतल्यानंतर,“मी सीबीआय अधिकारी बोलतो आहे. सुटका हवी असेल तर ऑनलाईन कोर्टात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजर राहावे लागेल,” असे सांगण्यात आले.तसेच, हा प्रकार कुटुंबातील कोणालाही सांगू नका, अशी धमकीही देण्यात आली.२४ जानेवारी रोजी फिर्यादी यांना व्हिडिओ कॉल आला. कॉलवर न्यायालयासारखा सेटअप, एक व्यक्ती न्यायाधीशाच्या भूमिकेत, तर दुसरा वकील म्हणून बसलेला दिसत होता. या बनावट वकिलाने फिर्यादींकडून बँक खात्यांची व एफडीची माहिती घेतली.
७ बँक खात्यांत १० कोटी ७५ लाख ट्रान्स्फर
या बनावट वकिलाने फिर्यादींना,“तपासासाठी रक्कम सुरक्षित खात्यांमध्ये ट्रान्स्फर करा,” असे सांगत ७ वेगवेगळ्या बँक खात्यांत एकूण १० कोटी ७५ लाख रुपये ट्रान्स्फर करून घेतले.रक्कम ट्रान्स्फर झाल्यानंतर सायबर चोरट्यांनी,“तुमची सुटका झाली आहे. आता कुटुंबाला सांगू शकता,” असे सांगून कॉल कट केला.
मुलीला सांगितल्यानंतर उघडकीस आला फसवणुकीचा प्रकार
यानंतर फिर्यादींनी हा प्रकार आपल्या मुलीला सांगितला. हा संपूर्ण प्रकार सायबर फसवणूक असल्याचे लक्षात येताच त्यांनी तत्काळ सायबर पोलिस ठाण्यात धाव घेतली.सध्या या प्रकरणी अज्ञात सायबर चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, कोट्यवधींच्या व्यवहारांचा माग काढण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.