शिरूर शहरात अज्ञात व्यक्तीने कोयत्याचा धाक दाखवून दमदाटी केल्याची घटना

क्राईम शिरूर तालुका

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरुर शहरात (दि. ३०) मार्च रोजी सायंकाळी ७ : ३० वाजण्याच्या सुमारास एस.बी.आय चौक येथे घडलेल्या घटनेने परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. फिर्यादी भाऊसाहेब ताराचंद जाधव (वय 36, व्यवसाय – ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट, राहणार – पळवे बुद्रुक, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या क्रेटा गाडी (क्रमांक MH 12 SK 5666) समोर एक अज्ञात मोटरसायकलस्वार अचानक थांबला व त्याने त्यांची गाडी अडवली.

मोटरसायकलस्वार व्यक्तीने काहीही कारण नसताना रस्त्यात गाडी अडवून, आपल्या मोटरसायकलखाली ठेवलेला कोयता काढून फिर्यादीला शिवीगाळ व दमदाटी केली. या घटनेनंतर फिर्यादीने तत्काळ पोलिसांना माहिती दिली. शिरूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली आहे.

या प्रकरणी ए.एस.आय. बनकर यांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस हवालदार जगताप करीत आहेत. शिरूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे. या प्रकारानंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी त्वरीत आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घ्यावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. पोलिसांनी या प्रकरणात अधिक तपास सुरू केला असून, लवकरच आरोपीला अटक केली जाईल, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.