शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर येथे एका तरुणावर प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविरोधात अपशब्द वापरून सोशल मीडियावर पोस्ट टाकल्याच्या वादातून हा हल्ला झाल्याचे समजते. या प्रकरणी चार जणांविरोधात शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी वैभव संतोष भोसले (वय 2४) रा. पवार मळा, शिरूर याने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी रोशन देवरे (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही, रा. नाशिक) व त्याच्यासोबत असलेल्या तीन अनोळखी व्यक्तींनी त्याला मारहाण केली.
फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, ८ जानेवारी रोजी आरोपींनी त्यांचे नाव वापरून फेक अकाउंट तयार केले होते. त्या अकाउंटवरून भीमसेना महाराष्ट्र ग्रुप वर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकण्यात आली होती. त्यावरून वाद निर्माण झाला होता. हा विषय मिटवण्यासाठी आरोपींनी फिर्यादीला बोलावून घेतले आणि त्यांच्यावर हल्ला केला. ही घटना ३० मार्च रोजी संध्याकाळी ५ : १५ वाजता शिरूर ते रामलिंग रोडवरील नक्षत्र बिल्डिंगच्या शेजारी घडली. फिर्यादी यांना आरोपींनी फोन करून या ठिकाणी बोलावले होते. तिथे झालेल्या चर्चेदरम्यान, रोशन देवरे व त्याच्या साथीदारांनी अचानक फिर्यादीवर हल्ला केला. फिर्यादी यांना रोशन देवरे याने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि त्यांचा मोबाईल देण्याची धमकी दिली. तसे न केल्यास त्यांना जिवे ठार मारण्याची धमकीही दिली. याशिवाय, एका आरोपीने लोखंडी रॉडने फिर्यादीच्या उजव्या हातावर वार केला. दुसऱ्याने त्यांच्या डोक्यावर फायटरने मारून जखमी केले. तिसऱ्या आरोपीने निळ्या रंगाच्या केबलने पाठीत मारहाण केली. या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाले असून, त्यांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपासाची जबाबदारी पो. हवा. खेडकर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. तसेच, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. शिरूर पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून, आरोपींचा शोध सुरू आहे. पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले असून, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले आहे.