तिघांना अटक करत चार गावठी पिस्तुले, सहा काडतुसे जप्त
पुणे (प्रतिनिधी): अवैध अग्निशस्त्रे जवळ बाळगून परिसरात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या तीन आरोपींना पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने वेगवेगळ्या कारवायांत ताब्यात घेतले. आरोपींकडून चार गावठी पिस्तुले आणि सहा जिवंत काडतुसे असा एकूण १ लाख १९ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. बारामती तालुका, इंदापूर आणि यवत पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ९ आणि १० जुलै २०२६ रोजी या कारवाया करण्यात आल्या. तिन्ही आरोपींविरुद्ध भारतीय हत्यार कायद्यानुसार स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी अवैध अग्निशस्त्रांचा वापर करून गुन्हे करणारे, अवैध शस्त्रे बाळगणारे तसेच शस्त्रांची खरेदी-विक्री करणाऱ्या आरोपींविरुद्ध विशेष मोहीम राबविण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी स्थानिक गुन्हे शाखेसह जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांना कारवाईच्या सूचना दिल्या होत्या.स्थानिक गुन्हे शाखेची स्वतंत्र पथके अवैध गावठी पिस्तुले बाळगणाऱ्या आणि त्यांची खरेदी-विक्री करणाऱ्या व्यक्तींची माहिती संकलित करत होती.
रुई पाटीजवळ पहिली कारवाई…
दि ९ जुलै रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक बारामती परिसरात गस्त घालत असताना रुई पाटीजवळ एक व्यक्ती अवैध अग्निशस्त्र घेऊन उभी असल्याची माहिती गोपनीय बातमीदाराकडून मिळाली. या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन पंचांसमक्ष कारवाई केली. यावेळी ओम ऊर्फ लाला राजेंद्र कुदांडे (वय २०, रा. भानगाव, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) याला ताब्यात घेण्यात आले.
त्याच्या अंगझडतीत एक गावठी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस असा ५० हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून आला. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार स्वप्निल मदन अहीवळे यांनी फिर्याद दिली. बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३२०/२०२६ नुसार भारतीय हत्यार कायदा कलम ३ व २५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इंदापूर एसटी स्थानकाजवळ दोन पिस्तुले जप्त…
दि १० जुलै रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक इंदापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. इंदापूर एसटी स्थानकाजवळ एक व्यक्ती अवैध अग्निशस्त्र बाळगून दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने उभी असल्याची माहिती पथकाला मिळाली.
त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून शाहरुख इस्माईल मुजावर (वय २५, रा. बावडा, ता. इंदापूर, जि. पुणे) याला ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीत दोन गावठी पिस्तुले आणि चार जिवंत काडतुसे असा ५० हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल गणेश मच्छिंद्र डेरे यांनी या प्रकरणी फिर्याद दिली. इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४२१/२०२६ नुसार भारतीय हत्यार कायदा कलम ३ व २५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाटस येथील हॉटेलजवळ तिसऱ्या आरोपीला अटक…
त्याच दिवशी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक यवत परिसरात गस्त घालत असताना पाटस गावच्या हद्दीतील चांगुना हॉटेलजवळ एक व्यक्ती अवैध अग्निशस्त्र घेऊन उभी असल्याची माहिती मिळाली.यावेळी पोलिसांनी पंचांसमक्ष केलेल्या कारवाईत सनी कुमार केसरी प्रसाद (वय २५, मूळ रा. डोमणीमऊ, मोहम्मदपूर नोगवाँ, इलाहाबाद, उत्तर प्रदेश) याला ताब्यात घेतले.
त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस असा १८ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार विकास दशरथ कापरे यांनी फिर्याद दिल्यानंतर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ७०२/२०२६ नुसार भारतीय हत्यार कायदा कलम ३ व २५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शस्त्रे कोठून आणली, याचा तपास सुरु…
या अटक करण्यात आलेल्या आरोपींनी गावठी पिस्तुले कोठून आणली, ती कोणाकडून खरेदी केली, शस्त्रे बाळगण्यामागे त्यांचा नेमका उद्देश काय होता आणि त्यांचा अन्य गुन्ह्यांशी संबंध आहे का, याबाबत पोलिसांकडून तपास सुरु आहे. या अटक केलेल्या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून, त्यांच्या संपर्कातील व्यक्ती आणि शस्त्र पुरवठा करणाऱ्या साखळीचा शोध घेतला जात आहे.
तीन दिवसांत सात पिस्तुले, २१ काडतुसे जप्त…
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी मागील तीन दिवसांत दौंड आणि बारामती उपविभागात अवैध अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या व्यक्तींविरुद्ध केलेल्या कारवायांत एकूण सात गावठी पिस्तुले आणि २१ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.
अवैध अग्निशस्त्रे बाळगणारे, त्यांची विक्री करणारे तसेच शस्त्रांचा वापर करून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध ही मोहीम यापुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, बारामती विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम आणि दौंड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार, इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास नाळे, यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर, पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब कारंडे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी आणि अंमलदारांनी या कारवाईत सहभाग घेतला.