मातृत्व काळं ठरलं! २ महिन्यांच्या चिमुकल्याला जिवंत जाळत आई बनली यमदूत

क्राईम महाराष्ट्र

हैद्राबाद: हैदराबादमधील बोवरामपेट परिसरात आईनेच आपल्या दोन महिन्यांच्या चिमुकल्याला जळत्या चुलीत फेकून ठार केल्याची अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

पित्याने पाहिला थरकाप उडवणारा प्रसंग

मिळालेल्या माहितीनुसार, बाळाचा पिता राजेंद्र सकाळी कामावरून घरी परतला असता त्याने पत्नी ममता हिला स्वतःच्या बाळाला चुलीतील आगीत जाळताना पाहिले. बाळाच्या किंकाळ्या बाहेर जाऊ नयेत म्हणून त्याच्या तोंडात कापडाचा बोळा कोंडण्यात आला होता, अशी माहिती समोर आली आहे. राजेंद्रने तत्काळ बाळाला वाचवण्याचा प्रयत्न केला; मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.

मजुरी करून उदरनिर्वाह करणारे कुटुंब

मूळचे मध्य प्रदेशचे असलेले हे दाम्पत्य उपजीविकेसाठी हैदराबादमध्ये आले होते. बोवरामपेट येथील एका अपार्टमेंटमध्ये ते रखवालदार आणि मजुरीचे काम करत होते. मंगळवारी दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याचे सांगितले जाते. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

पोस्टपार्टम डिप्रेशनचा कोन?

प्राथमिक चौकशीत बाळ सतत रडत असल्यामुळे ममताने संतुलन गमावल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांकडून ‘पोस्टपार्टम डिप्रेशन’ म्हणजेच बाळंतपणानंतर येणाऱ्या मानसिक तणावाच्या कोनातूनही तपास सुरू आहे. संबंधित महिलेला कोणती मानसिक समस्या होती का, तिला मदतीचा अभाव होता का, याबाबत माहिती गोळा केली जात आहे.

सायबराबाद पोलीसांकडून गुन्हा दाखल

सायबराबाद पोलिसांनी आरोपी माता ममता हिला ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे. “ही अत्यंत संवेदनशील घटना असून सर्व बाजूंनी सखोल तपास सुरू आहे,” अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.दरम्यान, या घटनेमुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. तपासाअंती नेमकी कारणे स्पष्ट होणार आहेत.