राजस्थान: देशभरात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह असताना, नागौर जिल्ह्यात पोलिसांनी एका मोठ्या स्फोटक कटाचा उधळा लावला आहे. जिल्हा पोलीस आणि विशेष पथकाने शनिवारी रात्री हरसौर गावातील एका फार्म हाऊसवर धाड टाकून तब्बल १० हजार किलो अवैध अमोनियम नाइट्रेट जप्त केले आहे. ही आतापर्यंतची राज्यातील सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.
गुप्त माहितीच्या आधारे पोलिस अधीक्षक मृदुल कच्छावा यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. आरोपी सुलेमान खान याने आपल्या शेतातील घरात १८७ पोत्यांमध्ये अमोनियम नाइट्रेट लपवून ठेवले होते. यासोबतच पोलिसांनी ९ कार्टन डेटोनेटर, १२ कार्टन निळ्या फ्युज वायरचे १५ बंडल आणि लाल फ्युज वायरचे १२ कार्टन ५ बंडल असा मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे.
अमोनियम नाइट्रेट हा अत्यंत धोकादायक रसायन असून, याचा वापर यापूर्वी अनेक मोठ्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये झाला आहे. लक्षात घेण्यासारखे म्हणजे, नोव्हेंबर २०२५ मध्ये दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटातही अमोनियम नाइट्रेटचा वापर झाला होता. त्यामुळे या साठ्याचा संबंध एखाद्या मोठ्या कटाशी आहे की नाही, याची तपास यंत्रणा सध्या चौकशी करत आहे.
सुलेमान खान याला हरसौर पोलिसांनी अटक केली असून, तो आधीच स्फोटक कायद्यांतर्गत तीन वेळा गुन्हेगार आहे. प्राथमिक चौकशीत त्याने हा स्फोटक साठा कायदेशीर व बेकायदेशीर खाणकामासाठी पुरवण्यासाठी ठेवलेला असल्याचा दावा केला आहे.
नागौर पोलिसांनी जप्तीची माहिती केंद्रीय तपास यंत्रणांना तातडीने दिली असून, संघटित गुन्हेगारी आणि स्फोटक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक मृदुल कच्छावा म्हणाले, “राज्यातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे. सर्व बाजूंनी तपास सुरु असून, लवकरच यामागचे मुख्य सूत्रधार समोर येतील.