न्हावरे (अक्षय टेमगिरे): शिरूर तालुक्यातील आलेगाव पागा येथे राहत्या घरासमोरील पत्र्याच्या शेडच्या आडोशाला बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टीची दारुविक्री केल्याप्रकरणी शिरुर पोलिसांनी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत गावठी हातभट्टीची तयार दारु जप्त करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पांडुरंग रघुनाथ कोकरे (रा. आलेगाव पागा, ता. शिरुर, जि. पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार ईश्वर रावसाहेब चव्हाण यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे.
शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ जुलै २०२६ रोजी सायंकाळी वाजण्याच्या सुमारास आलेगाव पागा गावच्या हद्दीत अवैध गावठी दारू विक्री सुरू असल्याची माहिती शिरूर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी संबंधित ठिकाणी जात कारवाई केली.
यावेळी पांडुरंग कोकरे हा त्याच्या राहत्या घरासमोरील पत्र्याच्या शेडच्या आडोशाला गावठी हातभट्टीची तयार दारु आपल्या ताब्यात बाळगून ओळखीच्या लोकांना विक्री करत असल्याचे आढळून आले.पोलिसांनी घटनास्थळावरुन गावठी हातभट्टीची दारु जप्त केली आहे. या प्रकरणी शिरुर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारुबंदी कायदान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांच्या नोंदीनुसार, संबंधित व्यक्तीविरुद्ध यापुर्वीही सन २००७ मध्ये मारहाण, शिवीगाळ, धमकी आणि बेकायदेशीर जमावाशी संबंधित कलमांन्वये शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद असल्याची माहिती देण्यात आली आहे.शिरुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील अधिक तपास पोलीस हवालदार पवार करत आहेत.
शिरुर तालुक्यात अवैध गावठी दारु निर्मिती, वाहतूक आणि विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई सुरुच राहणार असुन नागरिकांनी असे अवैध धंदे कुठे चालु असल्यास पोलिसांना माहिती द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल.
विनोद पाटील (पोलिस निरीक्षक)
शिरुर पोलिस ठाणे