शिरुर तालुक्यात रस्त्याच्या कामादरम्यान टँकरच्या धडकेत मजुराचा मृत्यू; चालकावर गुन्हा दाखल

क्राईम शिरूर तालुका

न्हावरे (तेजस फडके): कोळगाव डोळस ते मांडवगण फराटा दरम्यान सुरू असलेल्या रस्त्याच्या कामादरम्यान टँकरने दिलेल्या जोरदार धडकेत एका मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी टँकर चालक दत्तात्रय अभिमन्यु साळुंखे (रा.सवारी, ता.निलंगा, जि. लातूर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या अपघातात मृत्यू पावलेल्या मजुराचे नाव सुरज संतोष धायगुडे (वय ३०) रा.अकोले, ता. इंदापूर, जि. पुणे) असून त्याचा भाऊ समीर संतोष धायगुडे (वय २५) यांनी शिरुर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हि दुर्दैवी घटना दि ६ जून २०२५ रोजी सकाळी १०.४५ च्या दरम्यान घडली. विलास फराटे यांच्या घरासमोर, रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरु असताना टँकर क्रं एम एच १३ सी यु ८७७६ च्या चालकाने टँकर मागे घेतल्यामुळे सुरज धायगुडे याला जबर धडक बसली. या धडकेत त्याच्या उजव्या बाजुच्या बरगड्यांना व उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.या प्रकरणी शिरुर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील अधिक तपास पोलिस हवालदार गवळी हे करत आहेत.