न्हावरे: शिरूर तालुक्यातील रांजणगाव सांडस येथील भीमा नदीकाठच्या शेतातील महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याच्या कॉइल चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रांजणगाव सांडस येथील गट क्रमांक १५१ मधील भैरवनाथ अॅडिशनल ६३.२२ केव्ही क्षमतेच्या वीज ट्रान्सफॉर्मरमधील ऑइल सांडून अज्ञात चोरट्यांनी ट्रान्सफॉर्मर उघडला. त्यानंतर त्यामधील सुमारे ४० किलो वजनाच्या तांब्याच्या कॉइलची चोरी करून पोबारा केला.
चोरीस गेलेल्या तांब्याच्या कॉइलची किंमत सुमारे २० हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. ही घटना १ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजल्यापासून २ जुलै रोजी दुपारी २ वाजेपर्यंतच्या कालावधीत घडली.याप्रकरणी रामेश्वर दिगंबर चव्हाण (वय ५०, रा. शिक्रापूर) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता तसेच भारतीय विद्युत अधिनियमांतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पवार करीत आहेत.