shirur-taluka-logo

रांजणगाव गणपती येथे ३ ऑक्टोबर रोजी भव्य महास्वच्छता अभियान; ५ हजार विद्यार्थी…

शिरूर तालुका

रांजणगाव गणपती : राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त निर्मलग्राम ग्रामपंचायत रांजणगाव गणपती यांच्या वतीने शनिवार, दिनांक ३ ऑक्टोबर २०२६ रोजी गावामध्ये भव्य “महास्वच्छता अभियान -२०२६” आयोजित करण्यात आले आहे. या अभियानामध्ये सुमारे ५ हजार शालेय विद्यार्थी, शिक्षक, महिला बचत गट, शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, आरोग्य विभाग, सामाजिक संस्था, विविध संप्रदाय तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

महास्वच्छता अभियानाची सुरुवात सकाळी ८.०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्मारक पूजनाने करण्यात येणार आहे. यावेळी ग्रामपंचायत पदाधिकारी व कर्मचारी, स्काऊट-गाईड विद्यार्थी तसेच विविध वेशभूषेतील विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर विविध शाळांच्या वतीने गावामध्ये जनजागृतीपर प्रभात फेऱ्या काढण्यात येणार आहेत.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गावठाण यांची प्रभात फेरी सकाळी ८.१५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथून सुरू होऊन ग्रामपंचायत कार्यालयामार्गे महागणपती मंदिर येथे पोहोचणार आहे. महागणपती ग्लोबल स्कूलची प्रभात फेरी सकाळी ८.३० वाजता महाराष्ट्र बँकेसमोरून सुरू होऊन महात्मा फुले चौक, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत कार्यालय मार्गे महागणपती मंदिर येथे पोहोचणार आहे. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीनेही आरोग्य केंद्र ते ग्रामपंचायत कार्यालय अशी प्रभात फेरी काढण्यात येणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shirur Taluka (@shirurtaluka)

ग्रामपंचायत कार्यालयासमोरील कार्यक्रम
सकाळी ९.०० वाजता ग्रामपंचायत कार्यालयासमोर मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमामध्ये सामूहिक स्वच्छता शपथ, मान्यवरांचे स्वागत व सत्कार, शाळांच्या वतीने पथनाट्य सादरीकरण तसेच महास्वच्छता अभियानात विशेष योगदान देणाऱ्या शाळा, संस्था व घटकांचा सन्मान करण्यात येणार आहे. महागणपती ग्लोबल स्कूल, मंगलमूर्ती विद्याधाम प्रशाला आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गावठाण यांच्या विद्यार्थ्यांकडून स्वच्छतेचा संदेश देणारे पथनाट्य व जनजागृतीपर उपक्रम सादर केले जाणार आहेत.

विविध परिसरात श्रमदान
मुख्य कार्यक्रमानंतर ग्रामपंचायत पदाधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, शिक्षक, मान्यवर व ग्रामस्थ यांच्या सहभागातून ग्रामपंचायत कार्यालय परिसर, बस स्थानक परिसर, पालखी ओटा परिसर तसेच आजूबाजूच्या परिसरात श्रमदान व स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. याशिवाय विविध शाळांमधील विद्यार्थ्यांच्या टीम तयार करून त्यांना निश्चित केलेल्या स्वच्छता स्पॉटवर पाठविण्यात येणार असून, प्रत्येक टीमकडून संबंधित परिसरात स्वच्छता व श्रमदान करण्यात येणार आहे.

नेपाळमधील पूरग्रस्तांसाठी मदत संकलनाचा सामाजिक उपक्रम
या महास्वच्छता अभियानाला सामाजिक बांधिलकीची जोड देत, शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून नेपाळमधील पूरग्रस्त नागरिकांसाठी मदत निधी संकलित करण्यात येणार आहे. प्रभात फेरी तसेच महास्वच्छता अभियानादरम्यान विद्यार्थ्यांकडून नागरिकांना पूरग्रस्त बांधवांसाठी स्वेच्छेने मदत करण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांकडे मदत संकलन पेट्या उपलब्ध करून देण्यात येणार असून, नागरिक, व्यापारी, संस्था व उपस्थित मान्यवरांनी आपल्या परीने स्वेच्छेने मदत करून नेपाळमधील पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी हातभार लावावा, असे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे. ‘स्वच्छतेसोबत माणुसकीची जपणूक – आपत्तीग्रस्त बांधवांसाठी मदतीचा हात’ हा सामाजिक संदेश या उपक्रमातून देण्यात येणार आहे.

मान्यवरांची उपस्थिती…
या महास्वच्छता अभियानासाठी तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, गटविकास अधिकारी महेश डोके, गटशिक्षण अधिकारी प्रीतम कोकणे, उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. भोसले, पोलिस निरीक्षक कुमार कदम, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था शिरूर हरिश्चंद्र कांबळे, रांजणगाव गणपती मधील सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासह शेतकरी संघटना, ग्राहक संघटना,माहिति अधिकार संघटना चे विविध पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते तसेच,
आजी /माजी जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती सदस्य, आजी माजी सरपंच, उप सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच वि.वि.का सोसायटी चेअरमन व्हॉईस चेअरमन, संचालक, तसेच आजी माजी मार्केट कमिटी पदाधिकारी, महागणपती देवस्थान ट्रस्टचे आजी माजी पदाधिकारी, आजी माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

स्वच्छतेसोबत जनजागृतीचा संदेश
महास्वच्छता अभियानाचा उद्देश केवळ परिसर स्वच्छ करणे एवढाच नसून, विद्यार्थ्यांमध्ये, नागरिकांमध्ये आणि समाजातील विविध घटकांमध्ये स्वच्छता, सार्वजनिक आरोग्य, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करणे हा आहे. या अभियानातून “परिसर स्वच्छतेतून मनाची स्वच्छता” आणि “स्वच्छ भारत, एक कदम स्वच्छतेकडे” हा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. महास्वच्छता अभियानात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ग्रामपंचायत रांजणगाव गणपतीच्या वतीने संबंधित शाळांमध्ये नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

रांजणगाव गणपती गाव अधिक स्वच्छ, सुंदर व निरोगी बनविण्यासाठी या महास्वच्छता अभियानात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन निर्मलग्राम ग्रामपंचायत रांजणगाव गणपतीच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत