थापाडे कोण, हे महाराष्ट्राला ठाऊक! एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

महाराष्ट्र

अमित शाह यांच्यावरील टीकेला शिंदेंचे प्रत्युत्तर; शेतकरी प्रश्नांवरूनही विरोधकांना सुनावले

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना थापाडे म्हणणाऱ्यांनी आधी २०१९ मधील स्वतःचा राजकीय इतिहास तपासावा. महाराष्ट्रातील १४ कोटी जनतेचा विश्वासघात करून सत्तेच्या खुर्चीसाठी भाजपच्या पाठीतही खंजीर खुपसणारे आज दुसऱ्यांना थापाडे म्हणत आहेत. खरे थापाडे कोण आहेत, हे महाराष्ट्रातील जनतेला चांगलेच ठाऊक आहे, अशा आक्रमक शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता जोरदार निशाणा साधला. मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी विरोधकांच्या विविध आरोपांना प्रत्युत्तर दिले.

२०१९ मध्ये शिवसेना आणि भाजपची युती झाली होती. त्यामुळे राज्यात युतीचेच सरकार स्थापन व्हायला हवे होते. मात्र, केवळ मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीसाठी जनतेशी खोटे बोलण्यात आले. जनतेचा विश्वासघात करून ज्या भाजपसोबत निवडणूक लढवली, त्याच भाजपच्या पाठीत खंजीर खुपसण्यात आला. मग अमितभाईंना थापाडे म्हणण्याचा अधिकार कोणाला आहे? आधी स्वतःच्या राजकीय इतिहासातील थापांचा हिशेब द्या. जनतेशी विश्वासघात करणाऱ्यांनी दुसऱ्यांना नैतिकतेचे धडे देऊ नयेत, असा घणाघात शिंदे यांनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर दररोज टीका करायची, खोटेनाटे आरोप करायचे आणि त्यातून माध्यमांमध्ये प्रसिद्धी मिळवायची, हाच काहींचा उद्योग झाला आहे. ‘खोटे बोला, पण रेटून बोला आणि माध्यमांमध्ये राहा’, अशी त्यांची कार्यपद्धती आहे. मात्र, जनतेला सर्व काही समजते. केवळ आरोपांच्या फैरी झाडून वास्तव बदलत नाही, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राजकारण नको!

राज्यातील शेतकरी सध्या दुष्काळ, नैसर्गिक संकटे आणि आर्थिक अडचणींमुळे संकटात आहे. अशा परिस्थितीत त्याच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जातो, असे सांगता; मग एखादा बिस्किटाचा पुडा तरी शेतकऱ्याला दिला का? शेतकऱ्याला प्रत्यक्ष मदत करण्याऐवजी त्याच्या संकटावर राजकारण करणे योग्य नाही. राजकारणासाठी इतर अनेक विषय आहेत. मात्र, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे, असे शिंदे यांनी सुनावले.

रोहित पवारांच्या आरोपांनाही प्रत्युत्तर

एखाद्या उद्योजकासोबत फोटो असणे किंवा त्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणे म्हणजे संबंधित व्यक्तीला पाठीशी घालणे अथवा समर्थन देणे, असा अर्थ होत नाही. कोणाच्या कार्यक्रमाला जाणे हा गुन्हा नाही. त्यामुळे कोणताही ठोस पुरावा नसताना केवळ फोटोच्या आधारे आरोप करणे चुकीचे आहे, असे सांगत शिंदे यांनी रोहित पवार यांच्या वक्तव्यावर पलटवार केला.

विरोधकांना मोदी-अमित शाह फोबिया!

काहींची अवस्था अशी झाली आहे की, त्यांना दिवसभर मोदीजी आणि अमितभाई यांच्याशिवाय दुसरे काहीच दिसत नाही. त्यांना मोदी फोबिया आणि अमित शाह फोबिया झाला आहे, अशी टीका शिंदे यांनी केली. संताजी-धनाजींच्या इतिहासाचा संदर्भ देत मुलांच्या घोड्यांना पाणी पितानाही कोण दिसत होते, असा उपरोधिक सवाल करत त्यांनी विरोधकांची खिल्ली उडवली.

२०१९ मध्ये जनतेचा विश्वासघात करून सत्तेसाठी युती तोडणाऱ्यांनी आज थापाडेपणाच्या बाता मारणे म्हणजे ‘उलटा चोर कोतवाल को डांटे’ अशीच परिस्थिती आहे. महाराष्ट्रातील जनता हा इतिहास विसरलेली नाही आणि विश्वासघाताचा इतिहास पुसला जाणार नाही, अशा आक्रमक शब्दांत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत