तळेगाव ढमढेरे (ओमकार भोरडे): रात्रीच्या वेळी चाकूचा धाक दाखवून हायवेवर प्रवाशांना लुटणाऱ्या सराईत चोरट्यांना शिक्रापूर पोलिसांनी अवघ्या काही तासांत गजाआड केले आहे. या आरोपींकडून तब्बल २४ मोबाईल फोन, रोख रक्कम, चाकू आणि मोटारसायकलसह एकूण ३ लाख ३ हजार ३९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १३ ऑक्टोबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास फिर्यादी ज्ञानेश्वर एकनाथ जाधव (रा. कोंढापुरी, ता. शिरूर) हे मित्राच्या वाढदिवसावरून घरी जात असताना प्रसन्न हॉटेलसमोर पुणे–अहिल्यानगर महामार्गावर दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांना अडवून चाकूचा धाक दाखवत मोबाईल व रोख १ हजार १४० रुपये जबरदस्तीने काढून घेतले.
या घटनेची गंभीर दखल घेत शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांनी तातडीने तीन वेगवेगळी पथके तयार करून आरोपींच्या शोध मोहीमेला सुरुवात केली. तपासादरम्यान पो.उ.नि. महेश डोंगरे व सहा.पो.फौजदार शंकर साळुंखे यांना आरोपी कोरेगाव भिमा परिसरात संशयास्पदरीत्या वावरत असल्याची माहिती मिळाली.
पोलीसांनी तत्काळ सापळा रचून तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले. झडती घेतल्यावर त्यांच्या ताब्यातून २४ मोबाईल फोन, दोन काळे मास्क, चाकू, रोख रक्कम आणि एक मोटारसायकल असा एकूण ३ लाख ३ हजार ३९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
शिक्रापूर पोलिसांनी जेर बंद केलेले आरोपी
१) नवनाथ दशरथ वाहेकर (वय २२, रा. हिंगणे, सिंहगड रोड, पुणे) मुळगाव वाळुंज पारगाव, ता. जि. अहिल्यानगर
२) शिवराज मुरलीधर गोंडे (वय २१, रा. हिंगणे, पुणे) मुळगाव येवता, ता. केज, जि. बीड
३) पंढरीनाथ बालाजी खराटे (वय २२, रा. हिंगणे, पुणे) – मुळगाव कवठा, ता. वसमत, जि. हिंगोली या तिन्ही आरोपींनी या गुन्ह्यासह इतरही गुन्हे केल्याची कबुली दिली असून त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.सदरची कारवाई शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उ.नि. महेश डोंगरे व पो.कॉ. प्रतिक जगताप करत असून, आरोपींकडील उर्वरित मोबाईलचा तपशील मिळविण्याचे काम सुरू आहे.
ही यशस्वी कारवाई संदीप सिंह गिल्ल, पोलीस अधीक्षक सो. पुणे ग्रामीण, रमेश चोपडे, अपर पोलीस अधीक्षक पुणे, प्रशांत ढोले, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.या कारवाईत पो.उ.नि. जितेंद्र पानसरे, सहा.पो.फौजदार शंकर साळुंखे, पो.हवा. श्रीमंत होनमाने, अमोल दांडगे, विकास पाटील, रोहीदास पारखे, जयराज देवकर, शिवाजी चितारे, अमोल नलगे, प्रतिक जगताप, नारायण वाळके, राम जाधव यांनी सक्रिय सहभाग नोंदवला आहे.शिरूर तालुक्यातील नागरिकांनी शिक्रापूर पोलिसांच्या दक्ष आणि तात्काळ कारवाईचे कौतुक व्यक्त केले आहे.