शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील न्हावरा गावात एका शेतकऱ्याची सुमारे पाच लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली असून, शिरूर पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी शरद लक्ष्मण आसवले (वय २८, रा. आलेगाव पागा, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी कुणाल ताराचंद मालचे (रा. खामखेडा, ता. धरणगाव, जि. जळगाव) याने शेतकरी आसवले यांच्याकडे पूर्वीपासून गुऱ्हाळावर काम करून विश्वास संपादन केला होता. त्यानंतर त्याने आपल्यासोबत ९ कामगार आणण्याचे सांगून प्रत्येकी ५०,००० रुपये प्रमाणे एकूण ४,००००० रुपयांची रक्कम घेतली. तसेच, वेळोवेळी ऑनलाईन व्यवहारांद्वारे आणखी १, २८, ००० रुपये घेतले असून, त्यासाठी एंडोल (ता. एरंडोल, जि. जळगाव) येथे रजिस्ट्रेशन व नोटरी दस्तऐवज देखील करण्यात आले होते.
मात्र, कुठलेही कामगार न आणता आणि घेतलेली रक्कम न परत करता आरोपींनी विश्वासघात केला. या प्रकरणी कुणाल ताराचंद मालचे,रामा लक्ष्मण भिल,बापु सदा भिल, शांताराम सोमा भिल गोरख रामचंद्र भिल,नाना नामदेव भिल, संजय शांताराम भिल, विठोबा पंडीत भिल,संजय सुरसिंग सोनवणे (सर्व रा. वराड बुद्रुक, ता. धरणगाव, जि. जळगाव) या व्यक्तींविरुद्ध शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या गुन्हाचा पुढील तपास शिरूर पोलिस स्टेशनचे पो.ह.वा. भोते हे करत आहे.