शिरुर येथे पंचायत समिती आणि कृषी विभाग आयोजित खरिप आढावा बैठक संपन्न

मुख्य बातम्या शिरूर तालुका

कृषि विभागाच्या वतीने शेतकऱ्यांचा सन्मान 

शिरुर (तेजस फडके): शिरुर येथील प्रशासकीय इमारतीमध्ये नुकतीच आमदार अशोक पवार यांच्या उपस्थितीत खरीप हंगाम नियोजन व आढावा सभा संपन्न झाली. खरीप हंगाम अनुषंगाने पंचायत समिती व कृषी विभागाने नियोजन सादर केले. यावेळी विविध गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह शेतकरी, ग्रामसेवक तलाठी व कृषी सहायक उपस्थित होते. शिरुर चे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, गटविकास अधिकारी अजित देसाई तालुका कृषी अधिकारी सिद्धेश ढवळे, सेवा निवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे यांच्यासह व्यासपीठावर अध्यक्षस्थानी आमदार ॲड अशोक पवार उपस्थित होते.

यावेळी तालुका कृषी अधिकारी सिद्धेश ढवळे यांनी खरीप हंगाम नियोजनाबाबत सादरीकरण केले. तसेच उपस्थित सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शेतकरी यांच्या अडचणी आमदार ॲड अशोक पवार यांनी समजुन घेतल्या. कृषी विभागाने खरीप हंगाम 2021 मध्ये पिक स्पर्धा आयोजन केले होते. त्यामध्ये बाजरी, मुग, ज्वारी, गहु, हरभरा पिकाची स्पर्धा घेण्यात आली होती. त्यात निर्वी गावचे जयसिंग सोनवणे यांनी बाजरी पिकाचे उच्चांकी उत्पादन घेत विभागात प्रथम, तर मोहनराव सोनवणे यांनी तालुक्यात तृतीय क्रमांक मिळविला. तसेच मुग पिकात पुणे जिल्ह्यात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक शिरुर तालुक्याला मिळाला.

करडे येथील भाऊसाहेब पळसकर यांनी प्रथम, तर गुनाट येथील संभाजी भगत यांनी द्वितीय आणि अविनाश लंघे यांनी तृतीय क्रमांक मिळविल्याबद्दल आमदार पवार यांच्या हस्ते तालुक्यातील स्पर्धेत क्रमांक मिळविलेल्या शेतकऱ्यांना प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे विविध पिकाचे उत्पादन चांगले येत असुन शेतकऱ्यांचा सन्मान म्हणजे आमच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली गेल्याचे जयसिंग सोनवणे व मोहनराव सोनवणे यांनी सांगत समाधान व्यक्त केले. तसेच यापुढे राज्यात प्रथम येण्याच्या दृष्टीने वाटचाल करणार असल्याचे सांगितले.

पिकांच्या उत्पादन वाढीसाठी निर्वी आणि गुनाट परिसरात कृषी सहायक जयवंत भगत यांनी चांगले योगदान दिल्याची प्रतिक्रिया निर्वीचे जयसिंग सोनवणे यांनी व्यक्त केली. या खरीप नियोजन व आढावा बैठकिचे सुत्रसंचालन जयवंत भगत यांनी केले. तर पंचायत समितीचे कृषी अधिकारी जगताप यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.