कवठे येमाईत गावठी दारूचा अड्डा उद्ध्वस्त

क्राईम शिरूर तालुका

शिरूर पोलिसांची कारवाई; १लाख १३ हजाराचा मुद्देमाल जप्त

शिरूर: शिरूर पोलिसांनी मौजे कवठे यमाई (ता. शिरूर) परिसरात बेकायदेशीररीत्या गावठी हातभट्टी दारू तयार करणाऱ्या अड्ड्यावर छापा टाकून सुमारे १ लाख १३ हजार ७७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत आरोपी सागर गणपत गडगुळ (रा. कवठे यमाई) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस हवालदार बी.के. भवर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, (दि. २5) जून रोजी सायंकाळी ७ वाजता बाबाजी बागदरे व राज गडगुळ यांच्या शेताजवळील ओढ्याच्या कडेला आरोपी सागर गडगुळ हा बिगर परवाना गावठी दारू तयार करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून शिरूर पोलिसांनी तातडीने कारवाई करत छापा टाकला असता, कच्चे व जळके रसायन असलेले १५ बॅरल्स (३२०० लिटर), लोखंडी भट्टी, घमेले, ५ लिटर तयार दारू, ५ लिटर केमिकलयुक्त ताडी व इतर साहित्य असा एकूण ₹१,१३,७७५/- किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

छाप्यादरम्यान आरोपी उसाच्या शेतात पळून गेला असून, त्याच्याविरुद्ध भा.दं.वि. कलम १२३ व महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम ६५(क), (फ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत पो.ह. वारे (ब.नं. ८५०) तपास करत असून, प्रभारी पोलीस निरीक्षक केंजळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही धडक मोहीम राबवली. शिरूर पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरात दारूबंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत असून, स्थानिक नागरिकांनी पोलिसांचे कौतुक केले आहे.