शिरुर तालुक्यातील पहिली सर्पमैत्रिण शुभांगी टिळेकर; आजपर्यंत हजारो सापांचे वाचवले जीव

शिरूर तालुका

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे-शेलार) धाडसाच्या बाबतीत प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला देखील आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. त्यात ‘साप म्हटल की प्रत्येकाच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. सापाची भल्या भल्यांना भिती वाटते. परंतु शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथील शुभांगी गणेश टिळेकर या स्वतः साप पकडत असून शिरुर तालुक्यात पहिली महिला सर्पमैत्रीण होण्याचा मान त्यांनी मिळवला आहे.

 

शुभांगी या गृहिणीचे कार्य पार पाडत, तळेगाव ढमढेरे व आजूबाजूच्या परिसरामध्ये साप पकडण्याचे धाडसी काम त्या करतात. त्यांचे पती गणेश टिळेकर हे शिरुर तालुक्याचे सर्वात पहिले सर्पमित्र आहेत. लग्नानंतर पतीच्या रुपातच त्यांना एक चांगला गुरु देखील मिळाला. त्यामुळे प्रत्येक सापाची योग्य ती माहिती त्यांना मिळाली. यामध्ये नाग,घोणस,अजगर, धामण, मांजऱ्या, चित्रांगनायकूळ, तस्कर अशा 17 वेगवेगळ्या जातींचे अनेक साप,तसेच कोल्हा, गव्हाणी,घुबड ,राखी बगळा, कोकीळ, उदमांजर, रान मांजर अशा अनेक पक्षी व प्राण्यांना देखील त्यांनी जीवदान दिले आहे

 

नेचर गार्ड ऑर्गनायझेशन या संस्थेच्या त्या महाराष्ट्र सचिव आहेत. या संस्थेच्या माध्यमातुन शिरुर तालुक्यामध्ये शून्य सर्पदंश हे अभियान त्या सध्या राबवत आहेत. प्रत्येक गावोगावी साप पकडायला गेल्यानंतर साप व सर्पदंश याबद्दल योग्य ती माहिती त्या लोकांना देतात. सर्पदंश म्हणजेच मृत्यू नव्हे तर सर्पदंशामध्ये योग्य प्रथमोपचार व वेळेत उपचार मिळाल्यास रुग्णाचा खात्रीने जीव वाचत असल्याचे त्या दरवेळेस सांगतात. त्यांच्या या धाडसी कृत्याचे तालुक्यात नेहमीच कौतुक केले जाते.

 

सध्या उन्हाळा चालु असल्यामुळे धामण नर-मादी व नाग-नागिन यांचा मिलन काळ सुरु होतो. त्याचबरोबर गारवा व पाण्याच्या शोधात सापांचे घराजवळ येण्याच्या प्रमाणात देखील वाढ होते. त्यामुळे सर्वांनी दक्षता घेणे गरजेचे आहे. सापांना न मारता जवळच्या सर्पमित्रांना बोलविण्याचे आव्हान सर्पमैत्रीण शुभांगी टिळेकर यांनी केले आहे.