बिग बॉस मराठी ६’मध्ये पहिला लव्ह अँगल? रुचिताचे विशालसाठी अश्रू; प्रेक्षकांमध्ये रंगली चर्चा

मनोरंजन

मुंबई: ‘बिग बॉस मराठी’चा सहावा सीझन सुरू होऊन जवळपास एक महिना उलटला असून, घरातील घडामोडींनी प्रेक्षकांचे चांगलेच लक्ष वेधले आहे. सध्या सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चा रंगली आहे ती घरातील पहिल्या कथित लव्ह अँगलबाबत.

या चर्चेला उधाण आले ते ‘बिग बॉस मराठी’ने शेअर केलेल्या नव्या प्रोमोमुळे. या प्रोमोमध्ये रुचिताला विशालसाठी अश्रू अनावर झाल्याचे दिसून येते. त्यामुळे घरात काहीतरी खास नातं फुलतंय का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

नेहमीप्रमाणे यंदाही घरात दोन गट पडले असले तरी ‘टोळी’मधील सदस्य सुरुवातीपासून एकमेकांशी निष्ठावान असल्याचे पाहायला मिळते. रुचिताने आतापर्यंत अनेक स्पर्धकांशी वाद घातले असले, तरी प्रत्येक वेळी विशालने तिची ठामपणे बाजू घेतल्याचे दिसले आहे. नुकत्याच प्रसारित झालेल्या भागात राखी सावंतमुळे विशाल आणि रुचितामध्ये खटके उडाल्याचेही पाहायला मिळाले. त्यानंतर रुचिताला भावना अनावर झाल्या.

प्रोमोमध्ये रुचिता अनुश्रीसमोर विशालबद्दलच्या भावना व्यक्त करताना दिसते. अनुश्री तिची विचारपूस करताना म्हणते, “तुला काय फिलिंग्स आहेत विशालबद्दल?” यावर रुचिता भावूक होत म्हणते, “मला त्याचा प्रेझेन्स आवडतो… घरातले लोक जेव्हा माझ्या चुकांबद्दल बोलतात तेव्हा तो माझ्या पॉझिटिव्ह गोष्टींवर बोलतो. मी त्याच्याशी खूप अटॅच्ड आहे… खूप म्हणजे खूप! मला कळतच नाहीये मी काय करू?”

या संवादादरम्यान रुचिता रडताना दिसते. “आपल्या मनातली भावना रुचिता विशालला सांगेल का?” अशा कॅप्शनसह हा प्रोमो शेअर करण्यात आला आहे.

दरम्यान, या प्रोमोवर नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. रुचिता २१ वर्षांची आणि विशाल ४० वर्षांचा असल्याने त्यांच्या वयातील अंतरावरूनही चर्चा रंगल्या आहेत. “बिग बॉस मराठी ६ ची पहिली लव्हस्टोरी?”, “कॅमेऱ्यासाठी नाटक सुरू आहे का?”, “इतरांना लव्ह अँगल म्हणणारे आता स्वतः काय करत आहेत?” अशा मिश्र प्रतिक्रिया कमेंट्समध्ये पाहायला मिळत आहेत.

आता खरोखरच रुचिता आपल्या भावना विशालसमोर व्यक्त करणार का, आणि या नात्याला पुढे काय वळण मिळणार, हे पाहणे प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचे ठरणार आहे.