‘तारिणी’मध्ये पुन्हा अॅक्शनचा धमाका; केदारसाठी रणरागिणीचा अवतार

मनोरंजन

मुंबई: झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘तारिणी’ ही केवळ कौटुंबिक वाद, कट-कारस्थाने आणि भावनिक प्रसंगांसाठीच नाही, तर थरारक अॅक्शन सीक्वेन्ससाठीही ओळखली जाते. मालिकेत तारिणी आणि केदार हे स्पेशल क्राईम युनिटचा भाग असल्याने त्यांना विविध गुन्हेगारी प्रकरणांचा सामना करावा लागतो. त्यामुळे मालिकेत वेळोवेळी थरारक मारामारीचे प्रसंग पाहायला मिळतात आणि अशा भागांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळते.

आता पुन्हा एकदा मालिकेत जबरदस्त अॅक्शन पाहायला मिळणार आहे. काही दिवसांपूर्वी कौशिकीची प्रकृती ठीक नसल्याने केदारने एमएनएन या न्यूज चॅनेलमध्ये तिच्या ऐवजी राजकारणी बापुराव जामखंडे यांची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीदरम्यान केदारने जामखंडेंना कठोर आणि थेट प्रश्न विचारत त्यांचे ‘पितळ’ उघडे पाडले. यामुळे बापुराव जामखंडे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

समोर आलेल्या प्रोमोमध्ये बापुराव जामखंडे यांचे समर्थक खांडेकरांच्या घराबाहेर जमल्याचे दिसते. “बापुराव जामखंडे जिंदाबाद” अशा घोषणा देत ते केदारचा निषेध करत आहेत. “आमच्या बापुसाहेबांचा अपमान झाला आहे,” असे म्हणत ते घरात घुसण्याचा प्रयत्न करतात.

तारिणीचा रणरागिणी अवतार

याच वेळी तारिणी पुढे येत कार्यकर्त्यांना सुनावते, “केदारने काय चुकीचं केलं आहे? त्याने तुमच्या साहेबांचं सत्य जगासमोर आणलं आहे.” तिच्या या भूमिकेमुळे संतप्त कार्यकर्ते घरात शिरण्याचा प्रयत्न करतात. परिस्थिती गंभीर होताच तारिणी घरातील इतर महिलांना सुरक्षित खोलीत लपवते आणि स्वतः दरवाजा उघडून गुंडांचा सामना करण्यासाठी सज्ज होते.

यानंतर तारिणी आणि गुंडांमध्ये जोरदार मारामारी होत असल्याचे प्रोमोमध्ये पाहायला मिळते. केदारसाठी तारिणी प्रत्येक संकटाला भिडणार, अशी कॅप्शन देत झी मराठीने हा प्रोमो शेअर केला आहे. या दमदार सीनमुळे सोशल मीडियावर मालिकेचं जोरदार कौतुक होत आहे.

मालिकेतील महत्त्वाची गोष्ट म्हणजे केदार आणि तारिणी हे स्पेशल क्राईम युनिटचा भाग आहेत, हे कुणालाही माहित नाही. त्यांची खरी ओळख गुप्त ठेवली गेली आहे. त्यामुळे ते एकाच वेळी दोन वेगवेगळे आयुष्य जगताना दिसतात. सध्या केदार एमएनएन न्यूज चॅनेलमध्ये काम करताना दिसत आहे. पुढे या कथानकात कोणते नवे ट्विस्ट येणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.