‘शिवप्रताप- गरुडझेप’ चित्रपटातील अंगावर काटा आणणार गाणं…! नक्की पहा

मनोरंजन
मुंबई: स्वराज्याच्या चळवळीला गती देणारा ‘लोकोत्सव’ म्हणून गणेशोत्सव साजरा केला जातो.
लोकमान्य टिळकांनी स्वराज्याचा मंत्र दिला. आता त्या स्वराज्याचे सुराज्य करण्याचे आपले कर्तव्य आहे. आणि त्यासाठी प्रत्येकाच्या मनात सुराज्याचे स्फुल्लिंग चेतविण्यासाठी आणि गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी शिवप्रताप-गरुडझेप या आगामी भव्य मराठी चित्रपटातील शिवशक्तीमय गीत ‘जय भवानी जय शिवराय’! प्रदर्शित करण्यात आले आहे.
विजयादशमीच्या मुहुर्तावर ५ ऑक्टोबरला ‘शिवप्रताप-गरुडझेप’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. ‘जगदंब क्रिएशन’ प्रस्तुत आणि डॉ. अमोल रामसिंग कोल्हे निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन कार्तिक राजाराम केंढे यांनी केले आहे.
‘मराठमोळया मातीमधूनी, झऱ्यात खळखळणारी ! … नसानसांमध्ये शिवशक्ती, अजून सळसळणारी ! मनात आमच्या सत्वाची, रणभैरवी दुमदुमणारी !’… असे ‘जय भवानी जय शिवराय’! या गाण्याचे शब्द आहेत. प्रत्येकाच्या मनात जोश, उत्साह निर्माण करणाऱ्या या गीताचे बोल हृषिकेश परांजपे यांनी लिहिले असून गायक आदर्श शिंदे यांच्या ठसकेबाज आवाजात ते स्वरबद्ध करण्यात आलं आहे. शशांक पोवार यांचे संगीत या गीताला लाभले आहे.
‘स्वराज्याच्या चळवळीला गती देणारा हा लोकोत्सव, स्वराज्याचे सुराज्य करण्याच्या प्रयत्नांना पूरक कसा ठरु शकेल याचा विचार आता करण्याची गरज निर्माण झाली असून या शिवशक्तीमय गीतातून ही भावना जागृत होण्यास मदत होईल’, असा विश्वास अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला.
या चित्रपटातून छत्रपती शिवाजी महाराजांची अटक, औरंगजेबाच्या दरबारातील बाणेदार प्रसंगाबरोबरच आपल्या बुद्धिचातुर्याने तेथून करून घेतलेली सुटका हा सगळा शौर्याचा इतिहास पुन्हा एकदा जिवंत होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत डॉ. अमोल कोल्हे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविण्यासाठी सज्ज झाले आहेत.
डॉ. अमोल रामसिंग कोल्हे, विलास सावंत, सोनाली घनश्याम राव, चंद्रशेखर ढवळीकर,कार्तिक राजाराम केंढे हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. प्रफुल्ल तावरे सहनिर्माते आहेत. रविंन्द्र मानकामे कार्यकारी निर्माते आहेत. छायाचित्रण संजय जाधव यांचे असून संकलन पीटर गुंड्रा यांचे आहे. संवाद डॉ.अमोल रामसिंग कोल्हे, युवराज पाटील यांनी लिहिले असून पटकथा डॉ. अमोल रामसिंग कोल्हे यांची आहे. क्रिएटिव्ह कन्सल्टंट प्रशांत खेडेकर तर क्रिएटिव्ह सुपरवायजरची जबाबदारी कीर्ती डे घटक यांनी सांभाळली आहे.
कला दिग्दर्शक महेश गुरुनाथ कुडाळकर आहेत. साहसदृश्ये रवी दिवाण तर वेशभूषा मानसी अत्तरदे यांची आहे. नृत्यदिग्दर्शन दिपाली विचारे यांनी केलं आहे. रंगभूषा राहुल सुरते तर केशभूषा जयश्री नाईक यांची आहे. निर्मिती व्यवस्थापन क्रिएटिंग पिक्चर्सचे आहे.