रात्री ९ वाजताच्या टीआरपीच्या लढतीत ‘कमळी’ अव्वल; झी मराठीच्या पाच मालिका ठरल्या स्लॉट लीडर

मनोरंजन

मुंबई: छोट्या पडद्यावरील मालिकांची लोकप्रियता ही टीआरपीवर ठरते आणि प्रत्येक आठवड्यात अव्वल स्थान मिळवण्यासाठी मालिकांमध्ये चुरस पाहायला मिळते. गेल्या काही महिन्यांपासून रात्री ९ वाजताच्या स्लॉटमध्ये स्टार प्रवाहची ‘नशीबवान’ आणि झी मराठीची ‘कमळी’ यांच्यात जोरदार स्पर्धा सुरू होती.

मात्र फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात ‘कमळी’ने बाजी मारत ३.७ TVR सह स्लॉट लीडर होण्याचा मान पटकावला आहे. BARC इंडियाकडून जाहीर झालेल्या ताज्या टीआरपी अहवालानंतर झी मराठीने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर स्लॉट लीडर ठरलेल्या मालिकांचे आणि कलाकारांचे खास पोस्ट शेअर करत आनंद व्यक्त केला आहे.

विशेष म्हणजे, टीआरपीच्या शर्यतीत झी मराठीच्या तब्बल पाच मालिका स्लॉट लीडर ठरल्या आहेत. यामध्ये ‘कमळी’ आणि तेजश्री प्रधानची ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या दोन्ही मालिकांना ३.७ TVR मिळाला आहे.

रात्री साडेनऊच्या स्लॉटमध्ये *‘तारिणी’*ने ३.६ TVR सह बाजी मारली. केदारचा अपघात, त्याचं घरी परतणं आणि आजीची तारिणी-केदारच्या लग्नाची इच्छा असा भावनिक ट्रॅक प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरला आहे.

तर रात्री १० वाजता प्रसारित होणारी ‘देवमाणूस’ आणि साडेदहाच्या स्लॉटमधील ‘तुला जपणार आहे’ या मालिकांनीही आपापल्या वेळेत अव्वल स्थान पटकावलं आहे.

झी मराठीच्या स्लॉट लीडर मालिका

वीण दोघांतली ही तुटेना – ३.७ TVR (सायं. ७:३०)

कमळी – ३.७ TVR (रात्री ९:००)

तारिणी – ३.६ TVR (रात्री ९:३०)

देवमाणूस – ३.२ TVR (रात्री १०:००)

तुला जपणार आहे – २.७ TVR (रात्री १०:३०)

प्रेक्षकांचे आभार

झी मराठीने “कडक फेब्रुवारीची बेधडक सुरुवात…” असं कॅप्शन देत सर्व प्रेक्षकांचे मनापासून आभार मानले आहेत. दरम्यान, येत्या काही दिवसांत मालिकांमध्ये नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळणार असून, ‘कमळी’ची महाजनांच्या घरात अन्नपूर्णा आजीची नात म्हणून होणारी एन्ट्री टीआरपी आणखी वाढवेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.