मुंबई: ‘बिग बॉस मराठी’चा सहावा सिझन सध्या प्रचंड चर्चेत असून प्रत्येक एपिसोडमध्ये नवे वाद आणि ड्रामा पाहायला मिळतोय. नुकत्याच पार पडलेल्या एका एपिसोडमध्ये कॅप्टन्सीसाठी झालेल्या टास्कदरम्यान घरात मोठा वाद उफाळून आला.
कॅप्टन्सीसाठी खेळण्यात आलेल्या ‘बीबी पापड फॅक्ट्री’ या टास्कदरम्यान अभिनेता राकेश बापट आणि रुचिता जाधव यांच्यात जोरदार वाद झाला. याच टास्कमध्ये रुचिताने माझ्या अंगावर धाव घेत चुकीचा स्पर्श केला, असा धक्कादायक आरोप राकेशने केला आहे. राकेश या घटनेविषयी सांगत असताना प्रायव्हसीच्या कारणास्तव काही संवाद बीप करण्यात आले.
टास्कदरम्यान रुचिताच्या आक्रमक वागण्यामुळे राकेश चांगलाच संतापला होता. रागाच्या भरात तो थेट बेडरुममध्ये निघून गेला. त्यानंतर राकेशने ही संपूर्ण घटना दिपालीला सांगितली. राकेश आणि दिपाली यांच्यातील संवादामुळे रुचिताने घरात मोठा गोंधळ घातला.वाद वाढत चालल्यावर दिपालीने रुचिताला थेट राकेशसमोर जाऊन सर्वकाही स्पष्ट करण्याचा सल्ला दिला. मात्र, रुचिता ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. अखेर विशालने मध्यस्थी करत सर्वांना राकेशजवळ बोलण्यासाठी नेले.
दरम्यान, रुचिताविषयी राकेशचा राग अजूनही कायम असल्याचं स्पष्ट झालं.“मी टास्कदरम्यान तिला सांगत होतो की माझ्याजवळ येऊ नकोस. तरीही ती ऐकत नव्हती. ती खूप अॅग्रेशनमध्ये खेळत होती. मला आता या विषयावर अजिबात बोलायचं नाही. मी जे काही बोलायचं आहे ते थेट ‘भाऊच्या धक्क्यावर’ बोलेन,” असा इशारा राकेशने दिला.
रुचिता आणि विशाल निघून गेल्यानंतर कॅमेराकडे पाहत राकेश म्हणाला,“मला विशाल आणि रुचिताचं थोबाडसुद्धा बघायचं नाही. ते दोघंही मूर्ख आहेत.”यानंतर वॉशरूम एरियामध्ये प्राजक्ता शुक्रे आणि इतर स्पर्धकांशी बोलताना राकेशने पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट केली.
“मला सगळं स्पष्ट आठवतंय. रुचिता माझ्या अंगावर येत होती. मला धक्का लागला होता. मी नक्कीच यावर ‘भाऊच्या धक्क्यावर’ बोलेन,” असं तो म्हणाला.या गंभीर आरोपांमुळे आता प्रेक्षकांचं लक्ष पूर्णपणे आगामी ‘भाऊचा धक्का’ या विशेष एपिसोडकडे लागलं आहे. राकेश रितेशला रुचिताबद्दल नेमकं काय सांगणार आणि त्यावर रितेशची प्रतिक्रिया काय असेल, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.