मराठी-हिंदीतील लोकप्रिय अभिनेत्री मृणाल ठाकूरसोबत लग्नाच्या चर्चांना उधाण
मुंबई: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार अभिनेता धनुष सध्या पुन्हा एकदा खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. साउथसह हिंदी सिनेसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या धनुषच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. धनुष लवकरच लग्न करणार असल्याच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत.
विशेष म्हणजे, धनुष जिच्यासोबत लग्न करणार असल्याचं बोललं जात आहे, ती मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल ठाकूर आहे. ‘सीता रामम’ फेम मृणाल आणि धनुष यांच्याबाबतच्या या चर्चांमुळे चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
१४ फेब्रुवारीला लग्न?
मिळालेल्या माहितीनुसार, १४ फेब्रुवारी २०२६ रोजी व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी हे दोघे लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. मात्र, धनुष किंवा मृणाल ठाकूर यांच्याकडून अद्याप कोणताही अधिकृत खुलासा करण्यात आलेला नाही. त्यामुळे ही बातमी कितपत खरी आहे, याबाबत उत्सुकता कायम आहे.
रिलेशनशिपच्या चर्चांना उधाण
काही दिवसांपूर्वी मृणाल ठाकूरच्या आगामी चित्रपट ‘सन ऑफ सरदार २’ च्या प्रीमिअरला धनुषने हजेरी लावली होती. या कार्यक्रमात दोघांमधील जवळीक अनेकांच्या नजरेत भरली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये धनुष मृणालचा हात धरताना आणि दोघेही एकमेकांशी गप्पा मारताना दिसत आहेत. यानंतर चाहत्यांनी ते रिलेशनशिपमध्ये असल्याचा अंदाज बांधला.
वयात ९ वर्षांचे अंतर
वयाच्या बाबतीत पाहिल्यास, धनुष आणि मृणाल यांच्यात ९ वर्षांचे अंतर आहे. धनुषचा जन्म १९८३ साली झाला असून तो सध्या ४२ वर्षांचा आहे, तर मृणाल ठाकूर ३३ वर्षांची आहे.
१८ वर्षांच्या वैवाहिक आयुष्यानंतर रजनीकांत यांची कन्या ऐश्वर्या रजनीकांत हिच्याशी घटस्फोट झाल्यापासून धनुष सतत चर्चेत राहिला आहे. दुसरीकडे, मृणाल ठाकूरने नेहमीच आपले खासगी आयुष्य प्रसिद्धीपासून दूर ठेवले आहे.
सत्य काय, हे लवकरच स्पष्ट होणार
धनुष आणि मृणाल खरंच लग्न करणार की ही केवळ अफवा आहे, हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होईल. तोपर्यंत चाहत्यांमध्ये उत्सुकता आणि चर्चांना उधाण आले आहे.