वाघ्या–मुरळी परंपरेवर आधारित ‘फुला’ १७ एप्रिलपासून प्रदर्शित

मनोरंजन

मुंबई: मराठी मातीतल्या पारंपरिक वाघ्या–मुरळी लोकपरंपरेवर आधारित ‘फुला’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशातील या वैशिष्ट्यपूर्ण परंपरेतील स्त्री कलाकारांचा संघर्ष, वेदना आणि जिद्द मोठ्या पडद्यावर मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे.

खंडेरायाच्या साक्षीने जेजुरी येथे वाघ्या-मुरळी परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मार्तंड साठे यांच्या हस्ते चित्रपटाचे पोस्टर लाँच करण्यात आले. यावेळी निर्माते, दिग्दर्शक, कलाकार आणि तंत्रज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘फुला’ १७ एप्रिलपासून संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.

चित्रपटाची निर्मिती पै. अजित शिवाजी जाधव यांनी केली असून शिवशर्विल मूव्ही आणि बोधी सिनेमा प्रस्तुत हा चित्रपट दिग्दर्शक अभिषेक जावीर यांनी दिग्दर्शित केला आहे. पटकथा रवीकिरण जावीर यांची असून संगीत दिग्दर्शन समाधान ऐवळे यांनी केले आहे. छायांकन प्रताप जोशी, कला दिग्दर्शन अतुल लोखंडे आणि संकलन राहुल प्रजापती यांनी सांभाळले आहे.चित्रपटातील गाणी वैशाली सामंत, वैशाली माडे, रोहित राऊत यांसह अनेक गायकांनी साकारली आहेत.

काय आहे कथानक?

‘फुला’ ही एका मुरळीच्या पोटी जन्मलेल्या निरागस मुलीची भावस्पर्शी आणि संघर्षमय कहाणी आहे. तमाशा फड, जागरण-गोंधळ यांसारख्या लोकपरंपरांच्या पार्श्वभूमीवर उलगडणारी ही कथा समाजातील वास्तव प्रश्नांवर भाष्य करते. दिग्दर्शक अभिषेक जावीर यांच्या मते, हा चित्रपट केवळ एका मुलीची कथा नसून लोककलांमध्ये अडकलेल्या स्त्री कलाकारांच्या अस्तित्वाचा जिवंत दस्तावेज आहे.

आटपाडी गावातील टीमने साकारलेला हा पहिलाच चित्रपट असल्याने ‘फुला’कडून प्रेक्षकांना वास्तववादी आणि अस्सल मराठी अनुभवाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.